पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी भारताला अवघे १० ते १२ दिवस पुरेसे आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्याला ठाऊक आहे की पाकिस्तानचा भारताने तीन युद्धांमध्ये पराभव केला आहे. आपल्या सैन्य दलांनी ठरवलं तर अवघ्या १० ते १२ दिवसात ते पाकिस्तानचा पराभव करु शकतात असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. पाकिस्तान गेल्या काही दशकांपासून भारताच्या कुरापती काढतो आहे. पाकिस्तानच्या या कुरापतींमुळे आपल्या देशातील अनेक जवान, नागरिक यांचा मृत्यू झाला. इतक्या वर्षात पाकिस्तानच्या कुरापतींना काहीही उत्तर देण्यात आलं नाही. मात्र आता सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करुन भारताने त्यांना उत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. दिल्लीमध्ये NCC रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सहभाग होता. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

“भारताची जगातली ओळख ही तरुणांचा देश अशी आहे. आपल्या देशातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षे वयाच्या कमी वयाच्या लोकांची आहे. देशातील तरुणांचा, युवा वर्गाचा आम्हाला अभिमान आहे. देशाचे विचारही चिरतरुण राहिले पाहिजेत हे आपले सगळ्यांचे कर्तव्य आहे” असंही मोदींनी म्हटलं आहे.

” स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात जे झालं नाही ते आपल्याला करुन दाखवायचं आहे. एनसीसी देशातील तरुणांना राष्ट्रप्रेमाची जाणीव करुन देते. आपण जुन्या गोष्टी कुरवाळत बसण्यात काहीही तथ्य नाही. विकासाची कास धरली पाहिजे. ज्या देशात तरुण शासन, इच्छाशक्ती प्रबळ आणि कामावर निष्ठा असते त्या देशाचा विकास कुणीही थांबवू शकत नाही” असंही मोदींनी म्हटलं आहे.