बलात्कार आणि महिलांवरील इतरही अत्याचाराच्या सातत्याने वाढणाऱ्या घटनांमुळे आपली मान शरमेने झुकत आहे, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या़  महिलांवरील अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करतानाच गांधी यांनी, महिलांना भविष्यात कोणत्याही संकटांसमोर गुडघे न टेकता धर्याने त्याचा सामना करण्याचे आवाहन केले, तसेच देशाला महिलांची सर्व जबाबदारीच्या पदांवर आवश्यकता असल्याचेही महिला दिनानिमित्त गांधी यांनी शुक्रवारी भगत फूल सिंग महिला विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केलेल्या भाषणात सांगितल़े
काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे शासन महिलांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक व आर्थिक सबलीकरणासाठी अनेक पावले उचलीत आह़े  महिला अत्याचाराशी झुंजण्यासाठी लवकरच एक विधेयक पारित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितल़े  महिलांच्या बँकेसाठी आणि निर्भया निधीसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या १ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीचाही त्यांनी या वेळी उल्लेख केला़  तसेच महिलांना पित्याच्या मालमत्तेतील हिस्सा देण्यासाठी आणि कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठीही विधेयक आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितल़े
महिला दिनानिमित्त त्यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या आणि बलात्कार पीडितांवरील डाग पुसून टाकण्यासाठी कडक पावले उचलण्याची आवश्यकताही व्यक्त केली़  समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध आवाज उठविणे ही सुशिक्षित मुली आणि सर्वाचीच जबाबदारी आहे, असेही त्या म्हणाल्या़
पंचायत आणि महापालिकांमध्ये बऱ्याच महिला सहभागी होत आहेत़  महिला सबलीकरणाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आह़े  महिलांना सुशिक्षित करण्याच्या गरजेवर भर देताना त्या म्हणाल्या की, मुलीला चांगले शिक्षण देणे ही मोठी सामाजिक जबाबदारी आह़े  स्त्री शिकली तर केवळ कुटुंबच नव्हे तर पूर्ण समाजच सुशिक्षित होतो़