पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट- बलुचिस्तानमधील आपल्या बांधवांच्या पाठिशी उभे राहणे, ही भारताची नैतिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केले. तसेच या भागात पाकिस्तानकडून होणाऱ्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न जितेंद्र सिंह यांनी केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिरंगा फडकणे हाच तिरंगा यात्रेचा कळसाध्याय ठरेल, असेही सिंह यांनी म्हटले.
VIDEO: पाकिस्तान पडला तोंडघशी; बलुचिस्तानमध्ये नागरिकांनी दिल्या देशविरोधी घोषणा
दरम्यान, बलुचिस्तानमधील कार्यकर्ते हमाल हैदर यांनी पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. एखाद्या भारतीय पंतप्रधानाकडून पहिल्यांदाच बलुचिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. हा खूप मोठा निर्णय आहे, असे हैदर यांनी म्हटले. बलुचिस्तान आणि भारतीय जनतेचे विचार मिळतेजुळते आहेत. आम्ही निधर्मीवादी असून लोकशाही मुल्यांवर आमचा विश्वास आहे. पाकिस्तानने कधीही आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केले नाही, त्यांनी बलुचिस्तानमधील लोकांना ठार मारले, असा आरोपही हैदर यांनी केला. बलुचिस्तानच्या नागरिकांचे हाल सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रात हा मुद्दा उपस्थित करतील, अशी आम्हाला आशा असल्याची प्रतिक्रिया बलुचिस्तानमधील आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
सध्या सोशल मिडीयावर बलुचिस्तानमध्ये थेट पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे काश्मीरमधील परिस्थितीवरून भारताला शहाणपणाचे धडे शिकवणाऱ्या आणि मानवी हक्कांच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताला लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तानवर तोंडघशी पडण्याची वेळ ओढवली आहे.