आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं आहे. या अधिवेशनाला देशभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारदेखील या अधिवेशनाला उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या नावावर चालतो, असं त्यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या नियुक्तीबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज भरण्याची मुदत संपण्यापूर्वी केवळ शरद पवार यांचाच अर्ज आला. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्याच नावावर चालतो, हे आपल्याला माहीत आहे. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असावेत, अशी देशातील कार्यकर्ते, नेते, आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. सगळ्यांच्या आग्रहामुळे शरद पवारांनी सर्वांची इच्छा मान्य केली.”

हेही वाचा- राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनातून शरद पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले…

अजित पवारांनी पुढे म्हटलं की, “मागील दोन वर्षात करोना विषाणूचा संसर्ग असल्यामुळे पक्षाचे अधिवेशन घेता आलं नाही. महाराष्ट्रासह देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती, लोकांना एकत्र येण्यावर निर्बंध होते. आता करोनाचं सावट दूर झालं आहे. त्यामुळे अशा प्रकारे खुलं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. राष्ट्रीय पक्षाला अशा प्रकारची अधिवेशनं घ्यावीच लागतात” असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा- “अवघ्या १० मिनिटांत तीन कृषी कायदे मंजूर केले” शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरं तर, शनिवारी अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यानंतर शरद पवारांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे अवघ्या दहा मिनिटांत मंजूर केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. संबंधित कायद्याबाबत चर्चा करण्याचा संसदीय अधिकारही अस्वीकार करण्यात आला होता, असं त्यांनी म्हटलं होतं. याशिवाय देशातील बेरोजगारी आणि महिला सन्मानाच्या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारवर टीकास्र सोडलं होतं.