इम्फाळ : मणिपूरमधील जातीय हिंसाचारामुळे विस्थापित झालेले ५० हजारांहून अधिक नागरिक राज्यभरातील ३४९ मदत शिबिरांत राहत आहेत. राज्याचे माहिती व जनसंपर्क मंत्री व राज्य सरकारचे प्रवक्ते डॉ. आर. के. रंजन यांनी रविवारी सांगितले की, सर्व जिल्ह्यांत विशेषत: संवेदनशील भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या कारवाईत ५३ शस्त्रे आणि ३९ बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.

रंजन यांनी सांगितले, की या हिंसाचाराची झळ पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, तो लवकरच जाहीर केला जाईल. या हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या एकूण ५० हजार ६९८ नागरिकांनी सध्या ३४९ मदत शिबिरांत आश्रय घेतला आहे. विशेषत: महिला, वृद्ध आणि मुलांसाठी उघडलेल्या मदत केंद्रांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर नियंत्रणासाठी दरनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. राष्ट्रीय महामार्ग ३७ द्वारे विविध वस्तूंची राज्यात आणल्या जात आहेत.

मे महिन्याच्या सुरुवातीला  हिंसाचार उफाळला तेव्हा पोलिस ठाण्यांतून मोठय़ा प्रमाणात शस्त्रे लुटण्यात आली. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकांना शस्त्रत्यागाचे आवाहन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकांकडून १३० शस्त्रे जमा

पूर्व इम्फाळच्या आमदारांनी आपल्या निवासस्थानी ठेवलेल्या ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये ओळख उघड न करता शस्त्रे जमा करण्याचे आवाहन केले होते. युवकांनी त्याला पसंती देत आतापर्यंत स्वयंचलित रायफलींसह १३० शस्त्रे जमा केली आहेत.