दीप्तिमान तिवारी
पुलवामा हल्ल्याचा तपास करणाऱ्या यंत्रणांना हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या गाडीच्या मालकाचा सुगावा लागला आहे. या हल्ल्यासाठी मारुती-इको गाडीचा वापर करण्यात आला होता, असे ‘मारुती’च्या पथकाने म्हटले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी स्फोटाच्या ठिकाणाहून अनेक नमुने गोळा केले होते त्यावरून ही गाडी २०१०-११ मध्ये तयार करण्यात आली होती आणि त्याला नव्याने रंग लावण्यात आला होता, असे स्पष्ट झाले आहे.
या हल्ल्याचा शोध घेणाऱ्या पथकाने वरील दोन बाबी स्पष्ट केल्या असल्या तरी अद्याप ठोस निष्कर्ष काढता येऊ शकलेले नाहीत. मिळालेल्या माहितीची खातरजमा केली जात आहे. तपास यंत्रणेच्या पथकाने शुक्रवारी पुन्हा एकदा घटनास्थळी भेट देऊन काही नमुने गोळा केले आहेत. गाडीचे काही नवे भागही मिळाले आहेत, या भागांची आधी मिळालेल्या भागांसमवेत तपासणी केली जात आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तपास अधिकाऱ्यांना एक कॅन आणि धातूचे तुकडे मिळाल्याचे वृत्त ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने १९ फेब्रुवारी रोजी दिले होते.