भाजपाचं सरकार येण्यापूर्वी भेदभाव केला जात असे. आता सर्वांना समान न्याय मिळतो. २०१७ पूर्वी फक्त जे ‘अब्बा जान’ म्हणत होते, तेच रेशन संपवत होते असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं. त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. योगींवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती. हा वाद निवळत असतानाच आता पुन्हा भाजपाने अब्बा जानचं एक व्यंगचित्र शेअर केलंय. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटलंय.

उत्तर प्रदेश भाजपने हे व्यंगचित्र शेअर करून एएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधलाय. व्यंगचित्रात ओवैसी आणि अखिलेश यादव यांना मुघल सम्राट जहांगीर आणि अनारकली दाखवलंय, जे गरीबांच्या रेशनचा गैरवापर करत आहेत. तर ‘अब्बा जान’ म्हणून मुलायमसिंह यादव यांना दाखवलं असून ते रेशनचा गैरवापर होताना बघत बसले होते, असं म्हटलंय.

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या अब्बा जान टीप्पणीनंतर अखिलेश यादव यांनी त्यांच्यावर टीका केली होती. “चार वर्षांहून अधिक काळानंतरही, हे सरकार केवळ नावं आणि रंग बदलण्यात व्यक्त आहे. सपा सरकारने केलेली कामं स्वतःची असल्याचा दावा करत आहे. त्यांना माहित आहे की त्यांचे सरकार बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे त्यांची भाषा बदलली आहे,” असं अखिलेश यादव म्हणाले होते.

योगी आदित्यनाथांनी काय म्हटलं होतं..

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरमध्ये विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये विरोधी पक्षांवर विशेषकरून समाजवादी पार्टी (सपा)वर निशाणा साधला आणि आरोप केला होता की, “समाजवादी पार्टीचे सरकार गरिबांचे रेशन खाते व त्यांना मरू देते. ते केवळ अब्बा जान म्हणणाऱ्या एका समुदायास फायदा पोहोचवत होते. २०१७ च्या अगोदर गरिबांना रेशन का मिळत नव्हते? कारण तेव्हा राज्य सरकार चालवणारे आणि माफिया गरिबांचे रेशन खात होते आणि लोक उपाशी मरत होते व त्यांचे रेशन नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पोहोचत होतं. आज गरिबाचं रेशन कुणीच नाही घेऊ शकत, घेतलं तर तुरूंगात नक्कीच जाईल”.