‘पीटीआय, नवी दिल्ली
‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्यानंतर शस्त्रसंधी करण्यास सहमती दर्शवल्याबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर मंगळवारी टीका केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम हल्ल्याबद्दल राज्यसभेत सुरू झालेल्या विशेष चर्चेत सहभागी होताना चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाले पण ते निर्णायक होते की नाही हे केवळ काळच सांगेल असे चिदंबरम म्हणाले. यावेळी त्यांनी सैन्य दलांच्या आदर्श आणि प्रांजळ नेतृत्वाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, “या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या परिणामांबद्दल बोलायचे तर, हे मजबूत होते का असे तुम्ही विचारले तर मी म्हणेन ‘हो’. ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी होते का असे विचारले तर मी म्हणेन ‘हो’. जर ते निर्णायक होते का असे तुम्ही विचारले तर मी केवळ इतकेच म्हणेन की याचे उत्तर काळच देईल.”
“भारताने पाकिस्तानच्या ११ लष्करी हवाई तळांचे मोठे नुकसान केले. हे आम्ही स्वीकारतो. पण भारत शस्त्रसंधीला तयार का झाला हा प्रश्न आहे,” असे चिदंबरम म्हणाले. “भारत आता केवळ एका किंवा दोन आघाड्यांवर युद्ध लढत नाही. पाकिस्तान आणि चीन या आता दोन वेगळ्या आघाड्या नाहीत, तर त्यांची संयुक्त आघाडी आहे. पाकिस्तान, चीन आणि अन्य पक्षांच्या एकत्रित आघाडीचा सामना कसा करायचा याबद्दल काही योजना आहे का,” अशी विचारणा चिदंबरम यांनी केली. नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आणि मालदीव या शेजारी देशांना राजकीय शिष्टमंडळे का पाठवली नाहीत याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व देशांनी दहशतवादाचा निषेध केला आणि पीडितांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. पण कोणत्याही देशाने पाकिस्तानचे नाव घेऊन टीका केली नाही याकडे चिदंबरम यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.