P Chidambaram पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची जखम अजूनही ठसठसते आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे भारत आणि पाकिस्तानात शस्त्रविराम झाला का? असा प्रश्न उपस्थित करत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. याच दिवशी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचं वक्तव्य समोर आलं आहे. ज्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
काय म्हणाले पी. चिदंबरम?
“NIA ने तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे का? ओळख पटवली असेल तर ते कुठून आले होते? पाकिस्तानातूनच आले कशावरुन? भारतातच तयार झालेले दहशतवादी नसतील हे कशावरुन? दहशतवादी पाकिस्तानातून आले होते याचा पुरावा काय? सरकारकडून पाकिस्तानशी संघर्ष करताना काय नुकसान झालं ते का लपवलं गेलं?” असे प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत. न्यूज पोर्टल द क्विंटला दिलेल्या मुलाखतीत पी. चिदंबरम यांनी प्रश्न विचारले आहेत.
ऑपरेशन सिंदूरला बरेच आठवडे झाले
ऑपरेशन सिंदूरबाबत विचारलं असता चिदंबरम म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरला बरेच आठवडे झाले आहेत. पंतप्रधान म्हणतात ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. जर ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही तर नंतर काय पावलं उचलली? पहलगामसारखा आणखी एखादा हल्ला झाला तर तो रोखण्यासाठी तयारी झाली आहे का? पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत? हल्लेखोरांना अटक झाली असं सांगण्यात आलं, त्याचं काय झालं? खूप आमचे प्रश्न आहेत. असं पी.चिदरबंरम यांनी म्हटलं आहे.
पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यावर भाजपाची टीका
पी.चिदंबरम यांचं वक्तव्य समोर आल्यानंतर भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, पुन्हा एकदा काँग्रेस पाकिस्तानला क्लीन चिट देण्यासाठी धावाधाव करते आहे. आपलं लष्कर पाक पुरस्कृत दहशतवादाचा सामना करते. मात्र आता कांग्रेसचे नेते इस्लामाबादचे वकील वाटत आहेत अशी ठीका अमित मालवीय यांनी केली.
इमरान मसूद यांची टीका
दरम्यान काँग्रेस नेते इमरान मसूद यांनी भाजपावर टीका केली आहे. पाकिस्तानला क्लीन चिट आम्ही नाही तर सरकारनेच दिली आहे. पहलगामे दहशतवादी जिवंत आहेत याबाबत भाजपाला लाज वाटते का? असाही प्रश्न इमरान मसूद यांनी विचारला आहे.