नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशान्वये आपले गेल्या २५ वर्षांचे लेखा परीक्षण करण्यातून सूट दिली जावी यासाठी श्री पद्मानाभस्वामी मंदिर न्यासाने केलेली याचिका न्यायालयाने बुधवारी अमान्य केली. त्रावणकोरचे राजघराणे या मंदिराचे संचालन करते.

हे लेखा परीक्षण लवकरात लवकर, शक्यतो तीन महिन्यांच्या आत पूर्ण केले जावे, असे न्या. उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले.

‘सुचवण्यात आलेले लेखा परीक्षण मंदिरापुरते मर्यादित राहणे अपेक्षित नव्हते, तर न्यासाशी संबंधित होते. २०१५ सालच्या आदेशात नोंदण्यात आलेल्या न्यायमित्रांच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर या निर्देशाकडे पाहिले जावे’, असे एस. रवींद्र भट व बेला त्रिवेदी या न्यायाधीशांचाही समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले.