Asia Cup Tournament 2025: सध्या आशिया चषक स्पर्धेदरम्यान इतर कोणत्याही संघापेक्षा आणि त्यांच्यातील सामन्यापेक्षा सर्वाधिक चर्चा आहे ती भारत व पाकिस्तान या संघांमधील सामन्याची. रविवारी झालेल्या या सामन्यात भारतानं पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केलं. मात्र, भारतानं पाकिस्तानशी खेळण्याला राजकीय, सामाजिक व खुद्द क्रीडा क्षेत्रातूनही तीव्र विरोध होताना दिसत आहे. आता एकीकडे असा विरोध चालू असताना दुसरीकडे पहलगाम हल्ल्यात स्वकीयांना गमावलेल्या एका कुटुंबानं भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना व्हायला हरकत नाही, असं म्हटलं आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानशी इतर सर्व प्रकारची चर्चा बंद करण्याचा निर्णय भारतानं जाहीर केला. दहशतवादाबाबतच पाकिस्तानशी चर्चा होईल, असं भारतानं जाहीर केलं. त्यामुळे पाकिस्तानशी सर्व व्यवहारही बंद करण्यात आले. क्रीडा सामन्यांनाही नकार देण्यात आला. मात्र, तरीदेखील आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानशी क्रिकेट सामना खेळण्याची तयारी बीसीसीआयनं केली. रविवारी हा सामना झाला. या सामन्याला राजकीय वर्तुळातून विरोधकांनी तीव्र विरोध केला. या संपूर्ण वादावर आता पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया आली आहे.
“दहशतवादी हल्ला व क्रिकेट वेगळे ठेवा”
या वर्षी २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले. त्यातच नीरज उधवानी या तरुणाचाही समावेश होता. नीरज उधवानी पत्नी आयूषीसह नुकतेच दुबईहून शिमल्यात एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आले होते. तिथून ते पहलगाम येथे सुट्टीसाठी गेले. पण त्याच दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नीरज यांचे काका भगवानदास उधवानी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
“मला क्रिकेट पाहण्यात रस नाही. पण क्रिकेट आणि दहशतवादी हल्ला हे मुद्दे वेगळे ठेवायला हवेत. क्रिकेट खेळाच्या भावनेशी निगडित आहे. ती वेगळी बाब आहे. दहशतवादी हल्ला ही वेगळी बाब आहे. या दोन गोष्टींची तुलना केली जाऊ नये”, असं ते म्हणाले.
“हा सामना आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे”
दरम्यान, नीरज यांचे दुसरे काका प्रकाश उधवाणी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “पहलगाम हल्ल्याचा मुद्दा हा भारत-पाकिस्तान यांच्यातला मुद्दा आहे. पण आशिया चषक स्पर्धेतील क्रिकेटचा सामना हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे. इथे इतर देशांचे संघदेखील सहभागी झाले आहेत. जर भारत पाकिस्तानशी खेळला नाही, तर आपण स्पर्धेबाहेर पडू”, असं ते म्हणाले.
“आशियामधील पाकिस्तानचं स्थान हे इतर देशांप्रमाणेच आहे. त्यामुळे सामना तर व्हायला हवा होता. त्यात काही अडचण नाही. आपल्या माहिती आहे की भारत नेहमीच पाकिस्तानला हरवतो. तसंच याहीवेळी झालं. पण ती वेगळी बाब आहे. सामन्यावर बहिष्कार वगैरे फक्त डावपेचाचा भाग आहे. दोन देशांमधला मुद्दा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा हे वेगवेगळे मुद्दे आहेत. त्यामुळे हा सामना झाला हे योग्यच झालं”, असंही त्यांनी नमूद केलं.