Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने मध्यरात्री ‘एअर स्ट्राईक’ करत दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीत ‘एअर स्ट्राईक’ करत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

दरम्यान पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीत भारताने ‘एअर स्ट्राईक’ करत नऊ दहशतवादी छावण्यांवर हल्ला केल्यानंतर काही तासांतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व निमलष्करी दलांच्या प्रमुखांबरोबर एक बैठक घेत महत्वाचे आदेश दिले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करातील सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रजेवर असलेल्या सर्व जवानांना तात्काळ कर्तव्यावर हजर व्हावं लागणार आहे. या संदर्भातील निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. या बरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी संपर्क साधत सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या संदर्भातही महत्वाचे आदेश दिले आहेत.

तसेच सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या प्रमुखांना रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्याचे आदेश अमित शाह यांनी दिले आहेत. या बरोबरच देशातील अंतर्गत सुरक्षा परिस्थितीचाही आढावा घेण्यासह उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.