Pahalgam Terror Attack Militants Toolkit Travel instructions : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे देश हादरला आहे. एनआयएसह (राष्ट्रीय तपास यंत्रणा) इतर संरक्षण दलांची पथकं व गुप्तचर यंत्रणा या हल्ल्याचा तपास करत आहेत, तसेच काश्मीर खोऱ्यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांचं एक असं टूलकिट तपास यंत्रणांच्या हाती लागलं आहे ज्याच्या मदतीने हे दहशतवादी पहलगाममध्ये दाखल झाले आणि हल्ला करून फरार होण्यात यशस्वी झाले. दहशतवाद्यांना पहलगाममध्ये पाठवण्यापूर्वी त्यांच्या म्होरक्यांनी जे धडे दिले होते ते या टूलकिटमध्ये आहेत. तसेच यामध्ये दहशतवाद्यांचे कोड वर्ड्स (सांकेतिक शब्द) आणि दिशा-निर्देश देखील आहेत.

या टूलकिटमध्ये दहशतवाद्यांसाठी मार्गदर्शक सूचना, सांकेतिक शब्द, मदत करणाऱ्यांची माहिती, शस्त्रांस्रांची माहिती, साहित्य कुठे पोहोचवायचं आहे, त्यांना लागणारं साहित्य कुठे मिळेल याबाबतची माहिती व नकाशे आहेत.

गुप्त बैठकांचे नियम, दहशतवाद्यांसाठीच्या सूचना

  1. वस्तू, शस्त्रास्र किंवा माहिती देण्यासाठी एकांत असलेली जागा निवडावी, जिथे लोकांची फार वर्दळ नसावी.
  2. हे ठिकाण शासकीय इमारतींपासून लांब असायला हवं, जसे की स्मशानभूमी किंवा उद्यान
  3. वस्तू किंवा शस्त्रे हस्तांतरित करण्यापूर्वी पूर्ण तयारी करावी.
  4. कुठल्याही ठिकाणी ठरलेल्या वेळेत पोहायला हवं, वस्तू निर्धारित वेळेत पोहोचवल्या पाहिजेत.
  5. हातात घड्याळ व पायात आरामदायी बूट असले पाहिजेत.
  6. सामान ड्रॉप करण्यापूर्वी तिथे एक विशेष खूण करावी. जेणेकरून ती वस्तू पिक करणारी (उचलणारी) व्यक्ती त्या वस्तूची ओळख पटवू शकेल.
  7. इस्लामिक पोशाख परिधान करू नका, पाश्चात्य, आधुनिक किंवा स्थानिकांसारखे कपडे परिधान करावेत.
  8. कुठल्याही मित्राबरोबर फिरू नका.
  9. तुमचं साहित्य, शस्त्रे जिथे ठेवाल ती जागा निवासस्थानापासून दूर असावी.

या टूलकीटमध्ये डेड ड्रॉप पॉलिसीसाठी चार कोड वर्ड्स (सांकेतिक शब्द) आहेत.

  1. बिझी : साहित्य, शस्त्रे पोहचवता आली नाहीत तर असा कोड वर्ड वापरावा.
  2. खतरा : ड्रॉपच्या जागी (जिथे साहित्य पोहचवायचं आहे ती जागा) धोका आहे. तिथे कोणीही जाऊ नये. तसेच आपण संरक्षण यंत्रणेच्या, गुप्तचरांच्या रडारवर आहोत हा संदेश पोहोचवण्यासाठीचा सांकेतिक शब्द.
  3. ड्रॉप : साहित्य योग्य ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवलं आहे.
  4. पिक्ड अप : साहित्य मिळालं आहे किंवा जिथे ठेवलेलं तिथून उचललं आहे.