Pahalgam Terrorists Attack: थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या निसर्गरम्य अशा पहलगाममध्ये मंगळवारी भीषण असा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले. अमेरिकेत काम करणारा कोलकातामधील तंत्रज्ञ, हैदराबादमधील गुप्तचर विभागाचा अधिकारी, नौदल आणि हवाई दलातील अधिकाऱ्यांचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. महाराष्ट्रातील सहा जणांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. तर पहलगाम मधील स्थानिक नागरिक सय्यद आदिल हुसैन शाह या घोडेस्वारालाही दहशतवाद्यांनी संपविले.
पहलगामच्या बैसरण पर्वत खोऱ्यात वसलेल्या मिनी स्वित्झर्लंडला भेट देण्यासाठी हजारो पर्यटक रोज येत असतात. मंगळवारी (२२ एप्रिल) दुपारच्या दरम्यान अनेक पर्यटक याठिकाणी पोहोचले होते. पर्यटकांमध्ये अनेक राज्यातील नागरिकांचा समावेश होता.
हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २५ जणांचे मृतदेह श्रीनगर येथे आणण्यात आले आहेत. त्या त्या राज्यातील प्रतिनिधी श्रीनगर येथे जमले असून मृतांचे पार्थिव विमानाने पाठवले जाणार आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांची नावे
| मृतांचे नाव | राज्य |
| हेमंत जोशी | महाराष्ट्र |
| अतुल मोने | महाराष्ट्र |
| दिलीप देसले | महाराष्ट्र |
| संतोष जगदाळे | महाराष्ट्र |
| कौस्तुभ गणबोटे | महाराष्ट्र |
| संजय लेले | महाराष्ट्र् |
| तागेहलिंग | अरूणाचल प्रदेश |
| शुभम द्विवेदी | उत्तर प्रदेश |
| नीरज उधवानी | उत्तराखंड |
| प्रशांत कुमार सातपती | ओडिशा |
| मंजूनाथ राव | कर्नाटक |
| एन. रामचंद्र | केरळ |
| बितन अधिकारी | कोलकाता |
| समीर गुहार | कोलकाता |
| सुमीत परमार | गुजरात |
| शैलेशभाई हिंमतभाई कलाथिया | गुजरात |
| यतेश परमार | गुुजरात |
| दिनेश अग्रवाल | चंदीगढ |
| सुदीप न्यौपाने | नेपाळ |
| सय्यद आदिल हुसैन शाह | पहलगाम |
| मधुसूदन सोमीसेट्टी | बंगळुरू |
| भारत भूषण | बंगळुरू |
| मनीष रंजन | बिहार |
| सुशील नथयाल | मध्य प्रदेश |
| जे. सचंद्रा मोळी | विशाखापट्टणम |
| विनय नरलाव | हरियाणा |
गुप्तचर विभागातील अधिकाऱ्याचा मृत्यू
हैदराबादमध्ये गुप्तचर विभागात काम करणारे मनीष रंजन यांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. मनीष रंजन हे मुळचे बिहारचे होते. पत्नी आणि दोन मुलांसह ते जम्मू आणि काश्मीरला फिरायला गेले होते.
तसेच या हल्ल्यात नौदल अधिकारी विनय नरवाल (२६) यांचा मृत्यू झाला. नरवाल सध्या दक्षिण नौदल कमांड येथील कोचीमध्ये कार्यरत होते. हरियाणामधील कर्नाल येथील मूळचे रहिवासी असलेले नरवाल हसतमुख व मनमिळावू होते, असे त्यांच्या मित्राने सांगितले. लेफ्टनंट विनय नरवाल व त्यांची पत्नी हिमानी जम्मू-काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन १६ एप्रिल रोजी झाले. त्यानंतर हे दाम्पत्य चार दिवसांसाठी जम्मू-काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. विनय नरवाल दोन वर्षांपूर्वी नौदलात दाखल झाले होते.
अमेरिकेत काम करणारे २६ वर्षीय बितन अधिकारी यांचाही या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. ते नुकतेच अमेरिकेहून कोलकाता येथे परतले होते. पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलासह वेळ घालविण्यासाठी ते जम्मू आणि काश्मीरला गेले होते. अधिकारी यांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या बातमीनुसार बितन अधिकारी १६ एप्रिल रोजी काश्मीरला गेले होते आणि २४ एप्रिल रोजी ते परतणार होते.
