पाकिस्तानी सैन्याने सोमवारी रात्री केलेल्या जेट हल्ल्यात येथील दहशतवाद्यांचा तळ पूर्णत: उद्ध्वस्त झाला आह़े तसेच ४० दहशतवादीही ठार झाले आहेत़ उत्तर वझिरीस्तानातील टोळीवाल्यांच्या प्रदेशात झालेल्या या भीषण चकमकीत तालिबानी नेता अदनान रशीद याचेही घर उद्ध्वस्त करण्यात आले आह़े
पाकिस्तानी लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशीद हा पाकिस्तानी वायुदलातील माजी तंत्रज्ञ आह़े त्याला २००३ साली माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती़ मात्र एप्रिल २०१२ साली पाकिस्तानी तालिबान्यांनी तुरुंग फोडून त्याला पळवून नेले होत़े आता तो तालिबानी नेता असून या हल्ल्यात त्यालाच लक्ष्य करण्यात आले होत़े
अदनान रशीदही ठार ?
रशीद या हल्ल्यात त्याच्या कुटुंबीयांसह मारला गेल्याचे काही वृत्तवाहिन्यांचे म्हणणे असले, तरीही लष्करी सूत्रांनी मात्र त्याला दुजोरा दिलेला नाही़
दहशतवाद्यांच्या नेमक्या तळाबाबत आणि तेथे दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत गुप्तचर संस्थांचा खात्रीलायक अहवाल दिल्यानंतरच हवाई हल्ला करून हे तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितल़े
पेशावरमधील चर्च आणि किस्सा ख्वानी बाजार येथे झालेले हल्ले आणि रविवारी २६ जणांना ठार करणारा बन्नू येथील सुरक्षा दलाच्या तुकडीवर हल्ला यांच्याशी संबंधित अतिरेकीच या कारवाईत मारले गेल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आह़े तसेच यात काही अतिरेकी जखमीही झाले आहेत़
नागरिकही ठार झाल्याचा संशय
काहींच्या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही नागरिकही या हल्ल्यात मारले गेले आहेत; परंतु त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही़ या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांची अनेक घरे उद्ध्वस्त झाली़ त्यामुळे त्यांची तारांबळ उडाली आणि त्यांना सुरक्षित ठिकाण शोधत स्थलांतर करावे लागल़े त्यात काही स्थानिक जखमी झाले; परंतु संचारबंदी लागू करण्यात आल्याने त्यांना रुग्णालयातही नेता आले नाही, असे डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने म्हटले आह़े मंगळवारी सकाळीही पाकिस्तानी सैन्याने हेलिकॉप्टरमधून गोळीबार केल्याचेही डॉनने म्हटले आह़े
२००७ मध्ये स्थानिक तालिबानच्या प्रमुखाशी झालेल्या शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानने उत्तर वझिरीस्तानातील अतिरेक्यांविरुद्ध पहिल्यांदाच हवाई हल्ला केला आह़े
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2014 रोजी प्रकाशित
पाकिस्तानकडून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त; ४० ठार
पाकिस्तानी सैन्याने सोमवारी रात्री केलेल्या जेट हल्ल्यात येथील दहशतवाद्यांचा तळ पूर्णत: उद्ध्वस्त झाला आह़े तसेच ४० दहशतवादीही ठार झाले आहेत़
First published on: 22-01-2014 at 02:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak army retaliates to terror strikes 25 militants killed in north western regions