Pakistan defence minister khawaja asif new claim : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी शनिवारी पाकिस्तानच्या दोन आघाड्यांवरील युद्धाबाबत आणखी एक नवा दावा केला आहे. गेल्या महिन्यात अफगाणिस्तान बरोबर काही काळासाठी चाललेल्या संघर्षानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्धविरामावर सहमती झाली आहे. यादरम्यान आसिफ यांनी आता भारताबद्दल हा दावा केला आहे.
अफगाणिस्तानबरोबरचे पाकिस्तानचे संबंध बिघडत असताना, ख्वाजा आसिफ यांनी भारतावर गंभीर आरोप केला आहे. पाकिस्तानने पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील अशा दोन्ही आघाड्यांवर व्यस्त राहवे असा भारताची इच्छा असल्याचे ते म्हणाले आहेत. पाकिस्तानच्या पश्चिमेकडील सीमेवर नुकतेच अफगाणिस्तानबरोबर झालेला संघर्ष आणि पूर्वेकडील सीमेवर मे महिन्यात ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताबरोबर झालेल्या संघर्ष याच्या संदर्भात ते बोलत होते. हिंदुस्तान टाइम्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
ख्वाजा आसिफ यांनी वारंवार अफगाणिस्तानवर ‘भारतासाठी प्रॉक्सी म्हणून काम करत असल्याचा’ आरोप केला आहे. तसेच अफगाणिस्तानबरोबर तणावाचे वातावरण असतानाच दोन आघाड्यांवरील युद्धाचा इशाराही दिला आहे.
भारताविषयी बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, भाराताने अश्रफ घनी यांच्या काळापासूनच पाकिस्तानविरुद्ध प्रॉक्सी युद्ध सुरू केले आहे आणि आता या संदर्भातील पुरावे सर्वत्र मान्य होत आहेत. “जर आवश्यकता असेल तर आम्ही पुरवे सादर करू,” असेही ते जिओ न्यूजशी बोलताना म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले, “भारत पाकिस्तानला पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील अशा दोन आघाड्यांवर गुंतवून ठेवाण्याचा प्रयत्न करत आहे.”
अफगाणिस्तानबरोबर नुकत्याच झालेल्या युद्धविरामावर बोलताना आसिफ यांनी कतार आणि तुर्कियेने केलेले मध्यस्थीचे सकारात्मक परिणाम होईल असा आशावाद व्यक्त केला.
गेल्या महिन्यात अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर संघर्ष पेटला होता, यानंतर गुरुवारी इस्तंबूलमध्ये कतार आणि तुर्किये यांच्या मध्यस्थिने झालेल्या शांतेतेसाठीच्या चर्चेनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने युद्धविराम कायम ठेवण्यास सहमती दर्शवली आहे. विशेष बाब म्हणजे, दोन देशांमधील हा संघर्ष तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्या भारताच्या दौऱ्यावेळी झाला होता.
या आठवड्याच्या सुरूवातीला आसिफ यांनी दावा केला होता की अफगाणिस्तान हा भारताचे प्रॉक्सी म्हणून म्हणजेच भारताच्या सांगण्यावरून किंवा मदतीने कारवाया करत होता. तसेच त्यांनी तालिबान नेतृत्वाची भारताकडून फसवणूक केली जात असल्याचेही ते म्हणाले होते.
“काबूलमधील सूत्रे हलवणारे आणि बाहुल्यांचा खेळ मांडणारे लोक हे दिल्लीकडून नियंत्रित केले जात आहेत,” असे ख्वाजा आसिफ म्हणाल्याचे वृत्त डॉनने दिले आहे.