भारत-पाकिस्तानदरम्यानची द्विपक्षीय चर्चा थांबण्यामागे भारताचा आततायीपणा जबाबदार असल्याचा कांगावा करतानाच ‘काश्मीर मुद्यावर फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा करण्याची आमची वेळ चुकली’ अशी कबुली पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र कामकाज सल्लागार सरताज अझीज यांनी रविवारी दिली.  
भारताने २५ ऑगस्ट रोजी इस्लामाबाद येथे दोन्ही देशांची परराष्ट्र सचिव पातळीवरची बैठक निश्चित केली होती पण त्यापूर्वीच हुरियत नेते पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांना भेटले. त्यानंतर भारताने ही चर्चा रद्द केली. या पाश्र्वभूमीवर बोलताना अझीज यांनी हुर्रियत नेत्यांसोबत चर्चा करण्याची वेळ चुकली, असे म्हटले. मात्र, पाकिस्तानी राजनीतीज्ञ व हुर्रियत नेते यांच्यातील चर्चेची परंपरा जुनी आहे. काश्मिरी लोकांना भेटण्याचा अधिकार आम्ही सोडू शकत नाही, असे सांगत अझीज यांनी फुटीरतावाद्यांसोबतच्या चर्चेचे समर्थन केले.