पाकिस्तान सरकारने शुक्रवारी १०९ ‘मोस्ट वॉण्टेड’ दहशतवाद्यांची यादी जाहीर केली. त्यात माजी पंतप्रधान शौकत अझिझ यांच्यावर आत्मघातकी हल्ला करणारा लष्कर-ए-जांगवीचा दहशतवादी मती-ऊर-रेहमान याचा समावेश आहे.
या यादीत बंदी घातलेल्या लष्कर-ए-जांगवीचे २८ अतिरेकी आहेत. क्वेट्टामध्ये अलीकडेच शियापंथीयांवर हल्ले झाले होते, त्याची जबाबदारी लष्कर-ए-जांगवीने स्वीकारली आहे. त्याचप्रमाणे तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानच्या विविध गटांच्या ३४ दहशतवाद्यांचाही यादीत समावेश आहे.
मती-ऊर-रेहमान याच्यावर एक कोटी रुपयांचे इनाम असून त्याच्यावर २००२ मध्ये कराचीतील शेरेटन हॉटेलच्या बाहेर बॉम्बहल्ला करण्याचा आरोप आहे. या हल्ल्यात ११ फ्रेंच अभियंते ठार झाले होते.
रावळपिंडीत माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता, त्यामध्ये हात असल्याचा आरोप असलेला मन्सूर ऊर्फ छोटा इब्राहिम याचाही यादीत समावेश आहे. त्याच्यावर ५० लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे.
जांगवीचा सदस्य असलेल्या एहसान-ऊल-हक याचा यादीत तिसरा क्रमांक आहे. हक याच्यावर ५० लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो यांच्या हत्येत सहभाग असल्याचा आरोप असलेले पाकिस्तानचे तालिबानी फैझ मोहम्मद आणि इक्रम उल्लाह यांची नावेही यादीत आहेत.