अंगावर बॉम्ब जॅकेट घालून एका पाकिस्तानी गायिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. रबी पिरजादा असं या पॉप सिंगरचे नाव असून, तिने बाम्बचं जॅकेट अंगात घालून काश्मीरची बेटी असल्याचं सांगत मोदींना धमकी देणारा फोटो ट्विट केला आहे. तिच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी रबी पिरजादा हिला उलट प्रश्न करत मीम्समधून ट्रोल केलं आहे.

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं आहे. त्यानंतर हिंसाचार उफाळण्याची शक्यता असल्यानं सरकारनं संचारबंदीसह अनेक सेवांवर निर्बंध घातले होते. यावरून पॉप सिंगर रबी पिरजादा हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तिने अंगावर बॉम्ब जॅकेट घातलेला एक फोटो ट्विट करून मोदी हिटलर, मला तुम्हाला मारण्याची इच्छा आहे. काश्मीर की बेटी, असं वादग्रस्त विधान केलं. तिच्या या विधानानंतर नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे.

हा पाकिस्तानचा राष्ट्रीय गणवेश आहे का?, असा सवाल तिला असंख्य भारतीयांनी केला आहे. तर पारंपरिक पाकिस्तानी वेशभूषेत तू खुप सुंदर दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हा ड्रेस राष्ट्रीय गणवेश म्हणून घोषित करावा असं काही जणांनी म्हटलं आहे.

ट्विटरवरील फोटोवरून ट्रोल झाल्यानंतर रबी पिरजादा हिने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. “मोदींच्या सुरक्षेवरून मला धडे देणाऱ्या भारतीयांना मला सांगायचं आहे की, शांती आणि मानवता नांदावी हिच माझी इच्छा आहे. ज्या फोटोवरून माझ्यावर टीका केली जात आहे, तो फोटो दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणाऱ्या व्हिडीओतीलच आहे. तीन महिन्यांपासून अन्न आणि औषधांविना लोकांना ठेवलं जात आहे, हा न्याय आहे का? हे थांबवण्याची आठवण करून देण्यासाठी मी हे केलं,” असं सांगत तिने सारवासारव केली आहे.