चौकशीसाठी मसूद अझरला ताब्यात घेतल्याचा पाकचा दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझर व त्याचा भाऊ अब्दुल रहमान रौफ यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचा दावा बुधवारी पाकिस्तानकडून करण्यात आला. जैशच्या अनेक अड्डय़ांवर धाडी टाकून संघटनेच्या अनेक सदस्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे पाक सरकारने स्पष्ट केले. मात्र, या सर्वाना कुठे स्थानबद्ध करण्यात आले आहे याचा तपशील देण्यास पाकिस्तानी सूत्रांनी नकार दर्शवला आहे. दरम्यान, अझरवरील कारवाईबाबत पाककडून कोणतीही अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आली नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाच पाकिस्तानने अझरवर कारवाई केली. पठाणकोट हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर, ‘पाकिस्तानने दोषींवर कारवाई करण्याची तत्परता दाखवली तरच ही चर्चा होऊ शकेल’, असे भारताने गेल्याच आठवडय़ात ठणकावले होते.

मसूद अझर कोण?

१९९९ मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या आयसी-८१४ या विमानाचे अपहरण केले होते. त्यातील १५५ प्रवाशांच्या सुटकेसाठी दहशतवाद्यांनी भारताच्या ताब्यात असलेल्या अझरच्या सुटकेची मागणी केली होती.

अमेरिकेचा दबाव कारणीभूत..

पठाणकोट हल्ल्यानंतर दोषींवर तातडीने कारवाई करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणला होता. त्यातून ही कारवाई झाल्याचे स्पष्ट होत आहे.

चर्चेबाबत निर्णय आज

भारत आणि पाकिस्तान यांच्यात परराष्ट्र सचिव पातळीवर होऊ घातलेल्या बैठकीवर पठाणकोट हल्ल्याचे सावट आहे. या बैठकीबाबत गुरुवारी निर्णय घेतला जाईल, असे भारताने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने हल्लेखोरांवर कारवाई केली असली तरी त्याची अधिकृत माहिती भारताला दिलेली नाही.

पठाणकोट हल्ल्यासंदर्भात पाककडे असलेले पुरावे व भारताने उपलब्ध करून दिलेले महत्त्वाचे धागेदोरे यांच्या आधारावर जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांसाठी पाक भूमीचा वापर करू न देण्याचा आमचा ठाम निश्चय आहे. त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली आहे.

पाक पंतप्रधान कार्यालयाचे प्रसिद्धीपत्रक

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan arrests pathankot mastermind masood azhar
First published on: 14-01-2016 at 04:21 IST