पीटीआय, नवी दिल्ली

प्रतिकूल हवामानाच्या तडाख्यात सापडलेल्या भारतीय विमानाला आपल्या हद्दीत सुरक्षित प्रवेश करण्यास नकार देऊन पाकिस्तानचा अमानवी चेहरा पुन्हा जगासमोर आला. २२७ प्रवाशांना घेऊन दिल्लीहून श्रीनगरला निघालेल्या इंडिगो विमानाला बुधवारी खराब हवामानाचा फटका बसला. गारपीट आणि वादळातून बाहेर पडण्यासाठी या विमानाने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी परवानगी मागितली. या २२७ प्रवाशांचा जीव धोक्यात असतानाही पाकिस्तानने ही परवानगी नाकारली.

इंडिगो कंपनीच्या दिल्ली- श्रीनगर विमानाला बुधवारी पठाणकोटजवळ प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागला. तीव्र गारपीट आणि वादळामुळे या विमानाच्या प्रवासात अडथळे येत होते. अशा स्थितीत विमानाचे पुढचे टोकही (नोज) तुटले. विमानातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे भारतीय हवाई दलाच्या नॉर्दर्न कंट्रोलला आंतरराष्ट्रीय सीमेवर डावीकडे वळण्याची विनंती केली. मात्र ती मंजूर करण्यात आली नाही. त्यानंतर वैमानिकाने लाहोर हवाई वाहतूक नियंत्रणाकडे ही परिस्थिती टाळण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी मागितली. मात्र त्यांना परवानगी देण्यात आली नाही.

पाकिस्तानने परवानगी नाकारल्याने वैमानिकांनी प्रतिकूल परिस्थितीत विमान श्रीनगरकडे नेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या विमानाला हवेतील तीव्र झटके आणि गारपिटीचा सामना करावा लागला.

वादळात नेव्हिगेट करताना विमानाने विविध तांत्रिक इशारे दिले. विमानाच्या वेगामध्येही फरक पडला. या कालावधीत विमानाचा उतरण्याचा दर प्रति मिनिट ८५०० पर्यंत पोहोचला. अखेर या विमानाने श्रीनगर विमानतळावर सुरक्षित अवतरण केले. विमानातील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसल्याचे विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची ‘डीजीसीए’कडून चौकशी करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतपाकिस्तानने हवाईक्षेत्र बंदी कालावधी वाढविला

भारत आणि पाकिस्तानने आपापले हवाई क्षेत्र न वापरण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. पाकिस्तानी विमान कंपन्यांसाठी भारताने आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा कालावधी २३ जूनपर्यंत वाढविला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वाभूमीवर पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा एक भाग म्हणून भारताने ३० एप्रिल रोजी लागू केलेली बंदी २३ मे रोजी संपणार होती. दुसरीकडे, पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने भारतीय विमानांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र न वापरण्याची मुदत २४ जूनपर्यंत वाढवली आहे. प्राधिकरणाने निवेदन जारी केले.