Pakistan Bus Attack: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रातांत पंजाब प्रांतातील नऊ प्रवाशांची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. गुरूवारी एका बसमधून या प्रवाशांचे अपहरण करण्यात आले होते. बलुचिस्तान प्रांतातील झोब परिसरात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सदर घटना घडल्याचे झोबचे अतिरिक्त आयुक्त नाविद आलम यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, सशस्त्र बंडखोरांनी क्वेटाहून लाहोरला जाणाऱ्या बसमधील प्रवाशांचे ओळखपत्र तपासले. त्यानंतर बसमधून नऊ प्रवाशांचे अपहरण करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही अतिरेकी संघटनेने स्वीकारलेली नाही. बलुचमधील बंडखोरांनी अशाप्रकारचे हल्ले यापूर्वीही केलेले आहेत. पूर्व पंजाब प्रांतातून येणाऱ्या प्रवाशांची ओळख पटवून त्यांची हत्या झाल्याची प्रकरणे याआधी घडली आहेत. नाविद आलम यांनी सांगितल्यानुसर, मृत नऊ व्यक्ती पंजाब प्रांतातील विविध भागातून आले होते.
आलम यांनी पुढे म्हटले की, आम्ही नऊ मृतदेह रुग्णालयात आणले असून शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातील.
दरम्यान सशस्त्र बंडखोरांनी क्वेटा, लोरालाई आणि मास्टुंग या भागात तीन दहशतवादी हल्ले केले. परंतु हे हल्ले सुरक्षा यंत्रणांनी परतवून लावले असल्याचा दावा बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी केला. बलुचिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार, सशस्त्र बंडखोरांनी गुरूवारी रात्री अनेक भागात दहशतवादी हल्ले केले. ज्यामध्ये सुरक्षा दलाच्या चौक्या, सरकारी मालमत्ता, पोलीस ठाणे, बँक आणि कम्युनिकेशन टॉवर्सचा समावेश आहे.
सरकारचे प्रवक्ते रिंद यांनी हल्ले झाल्याचे कबूल केले असले तरी यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ते म्हणाले. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या बलुचिस्तान प्रांतात अनेक वर्षांपासून सशस्त्र उठाव होत असतात.
बलुचिस्तानमधील इराण आणि अफगाणिस्तान सीमेलगत असलेला भाग नैसर्गिक खनिजांनी संपन्न आहे. या भागात ६० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअर (CPEC) प्रकल्पाचे कामकाज सुरू आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी अनेकदा दहशतवादी हल्ले झालेले आहेत.