Operation Mahadev Pakistan Link: गेल्या आठवड्यात ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत पहलगाम हल्ल्याशी संबंधित हल्लेखोरांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला होता. त्यावेळी त्यांच्याकडून किमान तीन मोबाईल फोन आणि दोन LoRa (लांब पल्ल्याच्या) कम्युनिकेशन सेट जप्त करण्यात आले होते. या जप्त केलेल्या उपकरणांमधून मोठा डेटा सापडला आहे. यामध्ये दोन पाकिस्तानी नॅशनल डेटाबेस अ‍ॅण्ड रजिस्ट्रेशन अथॉरिटी कार्डचे फोटोदेखील आहेत. याबाबत सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे.

जप्त करण्यात आलेल्या उपकरणांमधून हा डेटा मिळवण्यासाठी सध्या राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संघटना या फोनची तपासणी करत आहे. यामध्ये पाकिस्तानचा आणखी कोणत्या प्रकारे काही संबंध आहे का, हे निश्चित करण्यासाठी लाँग रेंज कम्युनिकेशन सेटची देखील तपासणी केली जात आहे.

दहशतवाद्यांकडे काय सापडले?

ऑपरेशन महादेवनंतर सुरक्षा दलांनी जप्त केलेल्या इतर वस्तूंमध्ये एक गोप्रो हार्नेस, २८ वॅटचा सोलर चार्जर, तीन मोबाईल चार्जर, एक स्विस मिलिटरी पॉवर बँक, सुई आणि दोरा, औषधे, एक स्टोव्ह आणि मोठ्या प्रमाणात चहा पावडर यांचा समावेश आहे. याचबरोबर त्यांच्याकडे गंदरबल आणि श्रीनगरमधील दोन स्थानिक रहिवाशांच्या नावांवर दोन आधार कार्ड होती, हे देखील स्पष्ट झाले आहे.

आधार कार्ड

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानातील दहशतवाद्यांसाठी आधार कार्ड मिळवणे ही सामान्य गोष्ट आहे. यामुळे ते पोलीस चौक्यांवर संशय न येता सहजपणे फिरू शकतात. हे आधार कार्ड सहसा त्यांच्या ओव्हर ग्राउंड वर्कर्सकडून मिळवली जातात किंवा ती त्यांच्याच नावावर असतात.

सूत्रांनी सांगितले की, या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये स्थानिक संपर्कांच्या तपशीलांव्यतिरिक्त काही कागदपत्रे आणि फोटो आहेत, ज्यामुळे आणखी अटक होण्याची आणि गेल्या काही वर्षांत खोऱ्यात दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मिळालेल्या मदतीचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानी ओळखपत्र

जप्त केलेल्या फोनमध्ये दहशतवाद्यांच्या नॅशनल डेटाबेस अ‍ॅण्ड रजिस्ट्रेशन अथॉरिटी कार्डच्या तपशीलांचा समावेश आहे. हे कार्ड पाकिस्तान सरकारच्या नॅशनल डेटाबेस अ‍ॅण्ड रजिस्ट्रेशन अथॉरिटीने जारी केलेली संगणकीकृत राष्ट्रीय ओळखपत्रे आहेत. देशातील आणि परदेशात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठी ही प्राथमिक ओळख असते.

रेडिओ कम्युनिकेशन

दहशतवाद्यांकडून अलीकडील काळात लांब पल्ल्याच्या रेडिओ कम्युनिकेशन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. विशेषतः सीमावर्ती भागात, कारण याचा वापर सेल्युलर नेटवर्क किंवा इंटरनेटशिवाय करता येतो.