Pakistan Defence Minister Khawaja Asif Warns Afganistan Of Open War: इस्तंबूलमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेत जर कोणताही करार झाला नाही तर पाकिस्तान “उघडपणे युद्ध” सुरू करेल, असा इशारा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी शनिवारी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला दिला आहे.

“जर कोणताही करार झाला नाही तर आमच्याकडे त्यांच्याशी उघड युद्ध करण्याचा पर्याय आहे. पण मी पाहिले की त्यांना शांतता हवी आहे”, असे ख्वाजा असिफ म्हटल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये सुरू असलेल्या शांतता चर्चेदरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी हे वक्तव्य केले आहे.

इस्तंबूलमध्ये शनिवारी सुरू झालेली ही चर्चा रविवारपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे. २०२१ मध्ये तालिबानने अफिगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासूनच्या त्यांचा पाकिस्तानशी झालेला सध्याचा लष्करी तणाव सर्वात मोठा आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी हा तणाव शांत करण्यासाठी ही चर्चा सुरू केली आहे.

चर्चेची पहिली फेरी १९ ऑक्टोबर रोजी दोहा येथे झाली होती. कतार आणि तुर्कीने या चर्चेचे आयोजन केले होते. त्यावेळी २५ ऑक्टोबर रोजी इस्तंबूलमध्ये पुन्हा चर्चा करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले होते.

अफगाणिस्तानातील सुरक्षि ठिकाणी राहून हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले केल्यानंतर हा लष्करी संघर्ष सुरू झाला होता.

तालिबान सरकारने पाकिस्तानवर अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि पूर्व अफगाणिस्तानातील एका बाजारपेठेत हवाई हल्ले केल्याचा आरोप केल्यानंतर हा तणाव आणखी वाढला होता. पाकिस्तानने यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी तळ असल्याचे सांगून हल्ले सुरू केले होते.

दोहामधील शांतता चर्चेनंतर, पाकिस्तानने गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानात नवीन हवाई हल्ले केले होते. ज्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश होता.

पाकिस्तानमधील, एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, सैन्याने अफगाण सीमावर्ती भागात “अचूक हवाई हल्ले” केले आहेत, ज्यामध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) शी संबंधित स्थानिक संघटना हाफिज गुल बहादूरला लक्ष्य केले होते.