Pakistan Earthquake : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांच्या सीमारेषेवर तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी दहशतवादी तळांना लक्ष्य करत कारवाई केली. त्यामुळे पाकिस्तानची चलबिचल वाढली असून पाकिस्तान भारताच्या दिशेने ड्रोन हल्ले करत आहे. या ड्रोन हल्ल्याला भारत देखील जशास तसं प्रत्युत्तर देत आहे.

मागील काही दिवसांपासून दोन्ही देशातील तणाव वाढला असतानाच आता पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये ४.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रात्री १.४४ वाजता ४.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे तीव्र धक्के पाकिस्तानात जाणवले आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. तसेच या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त सध्या तरी समोर आलेलं नाही. या भूकंपाचं केंद्र १० किलोमीटर खोलीवर होतं आणि त्याचं स्थान २९.६७ अंश उत्तर अक्षांश आणि ६६.१० अंश पूर्व रेखांशावर नोंदवलं गेल्याचं सांगण्यात आलं आहे.

माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. याआधी सोमवारीही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या काही भागात ४.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता. तो भूकंपही १० किलोमीटर खोलीवर होता. दरम्यान, याआधी १२ एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली होती.