कोलकाता, नवी दिल्ली : झपाटय़ाने कमी होणारा विदेशी चलनाचा साठा, ऊर्जेचे देशव्यापी संकट, सरकारी अन्नधान्य वितरण केंद्रांवरील चेंगराचेंगरी आणि गेल्या वर्षभरात डॉलरच्या तुलनेत जवळपास ५० टक्क्यांनी घसरलेला पाकिस्तानी रुपया, या घटकांमुळे पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिकदृष्टय़ा गर्तेत जात असून, याचे भारतीय उपखंडात गंभीर परिणाम होऊ शकतील, असे भारतीय तज्ज्ञांचे मत आहे.

 या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, शाहबाझ शरीफ सरकार ‘बेल-आऊट पॅकेज’साठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी मंगळवारी  वाटाघाटी सुरू करणार असून,  पाकिस्तानवर कठोर आणि संभाव्य राजकीदृष्टय़ा धोकादायक अशा पूर्वअटी लादल्या जाऊ शकतील, असे या तज्ज्ञांनी सांगितले.

पाकिस्तानातील अस्थैर्याचा परिणाम म्हणून या भागात वाढणाऱ्या दहशतवादाचाच केवळ भारताला धोका नाही, तर बाह्य शत्रूवर लक्ष केंद्रित करून देशातील जनतेचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्नही पाकिस्तान करू शकतो.

‘पाकिस्तानातील सध्याच्या आर्थिक संकटातून राजकीय संकट जन्म घेत आहे. पैसा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्या अटी घालण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाकिस्तानला नक्कीच काही काळासाठी त्रास सहन करावा लागेल आणि त्याचे राजकीय परिणाम होऊ शकतील’, असे भारताचे पाकिस्तानातील माजी राजदूत टीसीए राघवन म्हणाले.

लष्कर बव्हंशी कारणीभूत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘भूतकाळाप्रमाणे तीन ए (आर्मी, अमेरिका व अल्ला) हे कशाहीप्रकारे पुन्हा आपल्या मदतीला येतील अशी आशा पाकिस्तानला होती. मात्र, आता काळ बदलला आहे. लष्कर पाकिस्तानच्या अर्थसंकल्पाचा सगळय़ात मोठा भाग गिळंकृत करत असल्याने ते स्वत:च पाकिस्तानच्या आर्थिक संकटांचे मोठे कारण आहे. त्यामुळे असहायपणे पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी आता अल्लालाच साकडे घातले आहे’, अशी टीका भारताचे कराचीतील शेवटचे वाणिज्य दूत राजीव डोगरा यांनी केली.