लंडन/इस्लामाबाद : ‘दहशतवादी गटांबाबत पाकिस्तानला इतिहास आहे आणि तो गोपनीय आहे, असे मला वाटत नाही. अशा इतिहासामुळे आपण त्रासातून गेलो आहोत. पाकिस्तान त्रासातून गेला आहे. दहशतवाद्यांच्या लाटांवर लाटांतून आपण सारे गेलो आहोत,’ अशी कबुली पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी दिली.
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी नुकतेच पाकिस्तानने पाश्चिमात्त्यांसाठी काही दशके अतिशय खराब काम केल्याची कबुली दिली होती. पाकिस्तानने दहशतवाद्यांना प्रशिक्षण, पैसाही पुरवल्याचे म्हटले होते. ख्वाजा आसिफ यांच्या मतांशी सहमत आहात का, यावर बोलताना भुट्टो-झरदारी यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांचा इतिहास असल्याचे वक्तव्य केले. माजी पंतप्रधान आणि भुट्टो यांच्या आई बेनझीर भुट्टो यांची दहशतवाद्यांनी हत्या केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
पाकिस्तानच्या इतिहासाचा मुद्दा असेल, तर तो इतिहास आहे… हे खरे आहे, की तो एक इतिहासातील दुर्दैवी भाग होता. या इतिहासात आम्ही एकटे नव्हतो.– बिलावल भुट्टो, प्रमुख, पाकिस्तान पीपल्स पार्टी