UNSC Meeting Slams Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारतासह जगभरातल्या देशांनी निषेध केला. अनेक देशांनी दहशतवादविरोधी लढ्यात सोबत असल्याचं आश्वासन भारताला दिलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या विरोधी वातावरण तयार होत असल्याचं पाहून पाकिस्तानने थेट संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे अर्थात UN Security Council मध्ये धाव घेतली. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्याची विनंतीही केली. पाकिस्तानच्या विनंतीवर बैठक भरली खरी, पण यात पाकिस्तानलाच सुनावण्यात आलं.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं सिंदू जल करार रद्द केला. त्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला. शिवाय अटारी सीमा बंद करण्याबरोबरच भारतातील पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. त्यात हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सीमेपलीकडून शस्त्रसंधीचं अनेकदा उल्लंघनही करण्यात आलं. शेवटी पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रात धाव घेतली. मात्र, तिथेही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.

UNSC ची बैठक आणि चर्चा

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक सदस्य राष्ट्रांनी विनंती केल्यास बोलावता येते. त्याप्रमाणे ती बोलावलीही गेली. पण या बैठकीत काय चर्चा झाली, याचा तपशील मात्र जाहीर केला जात नाही. न्यूयॉर्कमधील सूत्रांच्या हवाल्याने एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार या बैठकीत सर्व सदस्यांनी पाकिस्तानला पहलगाम हल्ला व त्यानंतरची आततायीपणाची पावलं यावरून सुनावलं आहे.

UNSC मध्ये ५ पूर्णवेळ सदस्य व १० अस्थायी सदस्य असे एकूण १५ सदस्य असतात. पाकिस्तान यावेळी अस्थायी सदस्य आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी सकाळी झालेल्या या बैठकीत पाकिस्तानला पहलगाम हल्ल्यासंदर्भात कठोर प्रश्न विचारण्यात आले. पाकिस्तानकडून भारताला दोष देण्याचे अपयशी प्रयत्न बैठकीत इतर सदस्यांवर पुरेसा प्रभाव पाडू शकले नाहीत.

लष्कर ए तैय्यबाचं कनेक्शन?

दरम्यान, पहलगाम हल्ल्याचा पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर ए तैय्यबाशी आहे का? असाही सवाल बैठकीत पाकिस्तानला विचारण्यात आला. याशिवाय, पहलगाम हल्ल्याचा निषेध करतानाच या हल्ल्यासाठी दोषी व्यक्तींवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी इतर राष्ट्रांनी केली. काही सदस्यांनी पाकिस्तानने नुकत्याच केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीवर आक्षेप घेतला.

पाकिस्ताननं सोमवारी फतेह श्रेणीतील जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या १२० किमीचा टप्पा असणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. मात्र, पाकिस्तानकडून करण्यात आलेली क्षेपणास्त्र चाचणी आणि त्यासोबत पाकिस्तानी नेत्याकंडून केली जाणारी अण्वस्त्रांसंदर्भातली विधानं तणाव वाढवणारी आहेत, अशी भूमिकाही इतर सदस्य राष्ट्रांनी मांडली.

UNSC चा मध्यस्थीस नकार, भारताशी बोलण्याचा सल्ला

दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं या प्रकरणात मध्यस्थी करण्यास नकार दिला. उलट पाकिस्तानलाच या मुद्द्यावर भारताशी बोलून तोडगा काढण्याचा सल्ला दिल्याचं एएनआयच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.