Bangladesh News Ahmadiyya Community : बांगलादेशमध्ये धार्मिक कट्टरता व जिहादी मानसिकता वेगाने पसरतेय, याचं एक ताजं उदाहरण म्हणजे तिथल्या कट्टर इस्लामी संघटनांनी सरकारकडे मागणी केली आहे की अल्पसंख्याक अहमदिया पंथाला गैर-मुस्लीम म्हणून जाहीर करावं. ही मागणी घेऊन बांगलादेशमधील कट्टर इस्लामी संघटना येत्या १५ नोव्हेंबर रोजी रस्त्यावर उतरून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यावेळी दारुल उलूम देवबंदसह पाकिस्तान व भारतीय धर्मगुरुंना आमंत्रित करण्यात आलं आहे.
बांगलादेशमधील शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर (५ ऑगस्ट २०२४) बांगलादेशमध्ये हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं जात आहे. यामध्ये अहमदिया पंथाचाही समावेश आहे. अहमदिया पंथांच्या लोकांवरही हल्ले होत आहे. त्यांची घरं, व्यवसाय, प्रार्थनास्थळं उद्ध्वस्त केली जात आहेत.
अमहदिया समुदायामध्ये भीतीचं वातावरण
पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशमध्ये देखील अहमदिया पंथाला गैर-मुस्लीम म्हणून जाहीर करावं अशी मागणी केली जात आहे. मुळात ढाकासह बांगलादेशमध्ये ही मागणी होणं काही नवीन नाही. यापूर्वी देखील तिथे अशी मागणी झाली आहे. मात्र, आता त्यांच्याविरोधात हिंसाचार होत आहे. या पंथाचे लोक स्वतःची ओळख सांगायला घाबरत आहेत. इंडिया टूडेने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
बांगलादेशमधील अहमदिया समुदायातील एका व्यक्तीने इंडिया टूडेला सांगितलं की “बांगलादेशमध्ये धर्मांध व अतिरेकी लोकांचं वर्चस्व निर्माण झालं आहे. बांगलादेश देखील धार्मिक अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्याच्या पाकिस्तानी मानसिकतेकडे झुकत आहे. बांगलादेशमध्ये अहमदिया पंथाचे एक लाख अनुयायी आहेत. १५ नोव्हेंबरच्या रॅली आधी या समुदायातील लोकांना हत्येची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे आमचे सर्व बांधव घाबरले आहेत.”
धर्मगुरू ‘क्रांती’ घडवणार?
अलीकडेच कट्टर इस्लामी संघटनांनी ढाक्यात एक मोर्चा काढला होता. त्यावेळी बांगलादेशमधील मुस्लीम धर्मगुरू मुफ्ती इनायतुल्लाह अब्बासी म्हणाले होते की “५ ऑगस्टचा उठाव एक मोठं बंड होतं. बांगलादेशात लवकरच धर्मगुरुंच्या नेतृत्वाखाली मोठी क्रांती होईल.”
“कदियानी (अहमदीया) जिथे आढळतील तिथे मारले जातील”, अशी धमकी देखील अब्बासी यांनी दिली आहे. कदियानी हा शब्द त्यांनी अहमदीया पंथाला हिणवण्यासाठी वापरला. ते म्हणाले, रस्ते नव्हे संसद बळकावून बांगलादेशमधील धर्मगुरू अहमदियांची गैर-मुस्लीम म्हणून घोषणा करण्याइतकी ताकद मिळवतील.
