Pakistan Train Attack Baloch Liberation Army Hijack Train : पाकिस्तानमधील अशांत अशा बलुचिस्तान प्रांतात फुटीरतावाद्यांनी संपूर्ण ट्रेनचं अपहरण केलं आहे. तब्बल ५०० प्रवाशांना घेऊन पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर फुटीरतावाद्यांनी हल्ला केला आणि त्यांनी या ट्रेनचं अपहरण केलं. ट्रेनमधील प्रवाशांची सुटका करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने कारवाई सुरू केली असून लष्कर व फुटीरतावाद्यांमध्ये चकमकी चालू आहेत. या चकमकीत ३० जवान शहीद झाल्याचा दावा फुटीरतावाद्यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला, या घटनेबाबत पाकिस्तानी लष्कराने फारशी माहिती उघड केलेली नाही. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) जाफर एक्सप्रेसमधील सुरक्षा दलांसह २१४ हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी लष्कर फुटीरतावाद्यांविरोधात काय कारवाई करणार? ओलिसांची सुटका कशी करणार? याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, भारत या घटनेवर लक्ष ठेवून आहे. या स्थितीत भारताचं पाकिस्ताबरोबरच्या सीमा अधिक सुरक्षित करण्याकडे लक्ष आहे. भारताने या घटनेवर अद्याप कोणतंही अधिकृत भाष्य केलं नसलं तरी भारतीय लष्करातून निवृत्त झालेले मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “बलुचिस्तान आता पूर्णपणे पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर गेलं आहे. तिथली सध्याची स्थिती व जनतेचा उद्रेक पाहता स्वतंत्र बलुचिस्तानच्या जन्माची वेळ आली आहे असं म्हणावं लागेल.”

“जीवितहानीशिवायी पाकिस्तानी लष्कर कारवाई करू शकणार नाही”

जी. डी. बक्षी म्हणाले, “बलुचिस्तान पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर आहे. तसेच पाकिस्तानी लष्करात मोठी निराशा आहे. अशा स्थितीत बलुचिस्तानमध्ये ट्रेनचं अपहरण होण्याची ही घटना खूप महत्त्वाची आहे. एका ट्रेनमध्ये ४५० ते ५०० प्रवासी असतात. या प्रवाशांना फुटीरतावाद्यांनी ओलीस ठेवलं आहे. अशा कुठल्याही घटनेत ओलिसांची सुटका करण्यासाठी जी कारवाई केली जाते ती अतिशय नाजूक असते. या कारवाईदरम्यान झालेल्या एक चुकीची संपूर्ण देशाला शिक्षा भोगावी लागू शकते. या कारवाईदरम्यान, मोठी जीवितहानी होण्याची भिती असते. मला वाटत नाही की कुठल्याही जीवितहानीशिवायी पाकिस्तानी लष्कर ही कारवाई करू शकेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बलुचिस्तानच्या जन्माची वेळ आली आहे : जी. डी. बक्षी

निवृत्त मेजर जनरल बक्षी म्हणाले, “ओलिसांची सुटका करताना लष्कर किंवा कमांडो ज्या प्रकारच्या मोहिमा हाती घेतात त्यामध्ये एनएसजी ही सर्वोत्तम आहे. एनएसजीने अशा कारवाया अचूक पार पाडल्या आहेत. परंतु, पाकिस्तानी लष्कर बऱ्याचदा केवळ दिखाऊपणा करण्यात व्यस्त असतं. अशा वेळी ते समोर उभ्या शत्रूला घाबरवू या हेतूने मोठी शस्त्रास्रे, तोफखाना घेऊन बाहेर पडतात. आत्ता पाकिस्तानी लष्कर ज्या प्रकारची कारवाई करू पाहतंय त्यावरून असं वाटतंय की यामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते. मला वाटतंय की आता बलुचिस्तानच्या जन्माची वेळ आली आहे. या घटनेवर आपण (भारताने) काळजीपूर्वक लेक्ष ठेवलं पाहिजे आणि सतर्क राहिलं पाहिजे. कारण पाकिस्तानी लष्कर लक्ष विचलित करण्यासाठी काहीही करू शकतं. आपल्याला आपल्या सीमा सुरक्षित ठेवाव्या लागतील. त्यामुळेच सावध राहावं लागेल.