Pakistan Airspace Ban for Indian Aircraft: भारत-पाकिस्तान तणाव निर्माण झाल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानाना स्वतःच्या हवाई हद्दीत प्रवेश नाकारला होता. मात्र हवाई क्षेत्र बंद करून पाकिस्तानने स्वतःचेच नुकसान करून घेतले आहे. पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाला (पीएए) अवघ्या दोन महिन्यांत १,२४० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा तोटा झाला आहे. पाकिस्तानमधील वृत्तपत्र डॉनने संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनाच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. १,२४० कोटी रुपयांचा आकडा इंडिया टुडे संकेतस्थळाने दिला आहे.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिली. भारताच्या या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांच्या विमानांना त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले.

डॉनच्या बातमीनुसार, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी माहिती दिली की, २४ एप्रिलपासून हवाई बंदी लागू केल्यामुळे देशाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याकाळात पाकिस्तानने भारतातील नोंदणीकृत विमाने, तसेच भारतीय विमान कंपन्यांकडून चालविण्यात येणारी विमानांना हवाई क्षेत्र बंद केले होते.

२४ एप्रिल ते ३० जून पर्यंत या बंदीमुळे दररोज १०० ते १५० विमान उड्डाणांवर याचा परिणाम झाला. तसेच पाकिस्तानच्या हवाई हद्दीतील वाहतूक जवळजवळ २० टक्क्यांनी घटली. यामुळे ओव्हरफ्लाइंग शुल्कातून होणारे पीएएचे उत्पन्न घटले, अशी माहिती डॉनच्या बातमीत देण्यात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्राची बंदी २४ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. ही बंदी आता २४ ऑगस्ट रोजी पहाटे ४.५९ पर्यंत कायम राहिल. पीपीएने जारी केलेल्या एका पत्रकात म्हटले की, भारतीय नोंदणीकृत विमाने, भारतीय विमान कंपन्यांनी चालविलेले आणि तसेच भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांना पाकिस्तानचे हवाई क्षेत्र उपलब्ध नसेल.

पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद असले तरी भारतीय विमानांनी इतर आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाचा वापर सुरू ठेवला आहे. तर पाकिस्तानच्या विमानांना मात्र अद्यापही भारताचे हवाई क्षेत्र उपलब्ध केलेले नाही. भारताचे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या विमानांसाठी हवाई क्षेत्र २३ ऑगस्ट पर्यंत बंद राहिल.