Rahul Gandhi Absent From Independence Day Event At Red Fort: लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे या दोन वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पार्टीने यामुळे काँग्रेसवर टीका केली आहे. शुक्रवारी (१५ ऑगस्ट) लाल किल्ल्यावर झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात रायबरेलीचे काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे दोघेही उपस्थित नव्हते. दोन्ही नेत्यांनी काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण केले.

७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. परंतु लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात दोन्ही प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पार्टी काँग्रेसविरुद्ध आक्रमक झाली आहे. भाजपाने याला पंतप्रधानपद, राष्ट्रध्वज आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’चा ‘अनादर’ असे म्हटले आहे.

सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसने इंदिरा भवन येथील काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी आणि खरगे या दोघांचेही राष्ट्रध्वज फडकवतानाचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. राहुल गांधींनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटोंसह लिहिले की, “सर्व देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. महान स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने मिळवलेल्या या स्वातंत्र्यातून असा भारत निर्माण करण्याचा संकल्प आहे, जिथे सत्य आणि समानतेच्या पायावर न्याय असेल आणि प्रत्येक हृदयात आदर आणि बंधुता असेल. या मौल्यवान वारशाचा अभिमान आणि सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. जय हिंद, जय भारत.”

भाजपाची टीका

भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, “काँग्रेस प्रवक्त्यांनी माझ्यासोबतच्या टीव्ही चर्चेत नुकतेच पुष्टी केली आहे की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. तो एक राष्ट्रीय उत्सव होता, परंतु दुर्दैवाने पाकिस्तानप्रेमी राहुल गांधी मोदींच्या निषेधार्थ देश आणि सैन्याचा विरोध करत आहेत! हे लज्जास्पद वर्तन आहे. संविधान आणि सैन्याचा हाच आदर आहे का?”

वादाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर राहुल गांधी आणि खरगे यांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंमध्ये ते नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथील काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकवताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याची किंवा त्यांच्यापासून अंतर ठेवण्याची काँग्रेसची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, देशातील प्रमुख विरोधी पक्षाने नवीन संसद भवनाच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाला हजेरी लावली नव्हती. निमंत्रण असूनही, काँग्रेसने राम मंदिर प्राण प्रतिष्ठान हा भाजपाचा कार्यक्रम असल्याचे कारण देत त्यात भाग घेतला नाही. काँग्रेसने म्हटले होते की, त्याचा धार्मिक भावनांशी काहीही संबंध नाही.