scorecardresearch

‘पाकिस्तानची वाटचाल धोकादायक मार्गाने; जिहादी चळवळीला माझी उणीव जाणवणार नाही’

जैश-ए-मोहम्मदच्या ‘अल-कलाम’ या ऑनलाईन मुखपत्रात मसूद अझरचा हा लेख प्रसिद्ध झाला आहे

Jaish Chief Masood Azhar,मसूद अझर,Masood Azhar , Pakistan, Pathankot attack, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
भारताकडून सतत आम्हाला मारा, पकडा अशा स्वरूपाच्या मागण्या होत असतात आणि इथे आमचे राज्यकर्ते आम्ही त्यांच्या भारताबरोबरच्या मैत्रीच्या संबंधात खंड पडल्यामुळे दु:खी असतात. आमच्या राज्यकर्त्यांना मोदी आणि वाजपेयी यांचे मित्र बनायचे असल्याचे मसूद अझरने म्हटले आहे.

पठाणकोट हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानकडून जैश-ए-मोहम्मद या संघटनेवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर या संघटनेचा म्होरक्या मसूद अझरने पाकिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तानी सरकारने जैश-ए-मोहम्मद विरोधात स्विकारलेला कारवाईचा मार्ग हा देशासाठी खूप धोकादायक आहे. सरकारची ही कृती मशिदी, मदरसे आणि जिहादी चळवळीच्या विरोधात असून त्यामुळे पाकिस्तानची एकात्मता आणि अखंडता धोक्यात आल्याचे मसूद अझर याने म्हटले आहे. जैश-ए-मोहम्मदच्या ‘अल-कलाम’ या ऑनलाईन मुखपत्रात मसूद अझरचा हा लेख प्रसिद्ध झाला आहे. मला अटक होण्याची किंवा मरणाची भीती नाही. मी मेलो तरी माझ्या मित्रांना किंवा शत्रुंना माझी उणीव भासणार नाही. मृत्युला कवटाळण्यासाठी सज्ज असलेले लष्कर तयार आहे. हे लष्कर आपल्या शत्रूंना जास्त काळ आनंदात राहू देणार नाही, अशी प्रार्थना मी अल्लाकडे करतो. माझ्या मरणाच्यावेळी माझी कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही, त्यासाठी मी अल्लाचा ऋणी आहे, असे या लेखात मसूदने म्हटले आहे.
या लेखामध्ये मसूद अझरने तिहार, काश्मीरमधील तुरूंगात असतानाच्या दिवसांचे संदर्भ दिले आहेत. १९९९ मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या आयसी-८१४ या विमानाचे अपहरण केले होते. त्यातील १५५ प्रवाशांच्या सुटकेच्या दहशतवाद्यांनी भारताच्या ताब्यात असलेल्या मसूदची सुटका करवून घेतली होती. दरम्यान, मसूद अझर व त्याचा भाऊ अब्दुल रहमान रौफ यांना पठाणकोट हल्ल्यासंदर्भात चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचा दावा काल पाकिस्तानकडून करण्यात आला होता.
दरम्यान, या लेखात मसूद अझरने पाकिस्तान सरकारवरही सडकून टीका केली आहे. भारताकडून सतत आम्हाला मारा, पकडा अशा स्वरूपाच्या मागण्या होत असतात आणि इथे आमचे राज्यकर्ते आम्ही त्यांच्या भारताबरोबरच्या मैत्रीच्या संबंधात खंड पडल्यामुळे दु:खी असतात. आमच्या राज्यकर्त्यांना मोदी आणि वाजपेयी यांचे मित्र बनायचे असल्याचे मसूद अझरने म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2016 at 09:11 IST

संबंधित बातम्या