बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्यावर मंगळवारी अभियोग दाखल करण्यात आला. हत्या, हत्येचा कट आणि त्यासाठी मदत केल्याप्रकरणी मुशर्रफ यांच्यावर दहशतवादविरोधी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, यात दोषी ठरल्यास त्यांना मृत्युदंड अथवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाऊ शकते. मुशर्रफ यांना कडक सुरक्षाकडय़ांसह रावळपिंडी येथील दहशतवादविरोधी न्यायालयात आणण्यात आले.
मुशर्रफ यांना हत्याकटात गोवण्यात आले आहे. त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून, त्यांच्या वकिलांचा ताफा त्यांच्या बचावासाठी प्रयत्न करीत असल्याचे ऑल पाकिस्तान मुस्लीम लिग या त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते आसिया इशहक यांनी पीटीआयला सांगितले. २००८ सालापर्यंत मुशर्रफ यांचे नाव भुत्तो यांच्या हत्याकटातील संशयितांच्या यादीतही नव्हते. भुत्तो यांनी अमेरिकी पत्रकार मार्क सीगल यांना पाठविलेल्या एका इ-मेलमुळे त्यांचे नाव यात गोवण्यात आले. जर हा इ-मेल न्यायालय ग्राह्य़ मानत असेल, तर भुत्तो यांनी आपली हत्या भविष्यात झाल्यास तीन माणसांना जबाबदार धरावे, या मुशर्रफ यांना पाठविलेल्या इ-मेलकडे न्यायालय का दुर्लक्ष करत आहे, असा सवाल इशहक यांनी केला. मुशर्रफ यांच्यावरील अभियोगाबाबत पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होणार आहे.
कयानींचे बोल
भुत्तो हत्येमध्ये तालिबानचा सहभाग असल्याच्या मुशर्रफ यांच्या दाव्याला मंगळवारी पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख जनरल अशफाक परवेझ कयानी यांनी आव्हान दिले. दिवंगत तालिबान प्रमुख बैतुल्ला मेहसूद याने भुत्तो हत्येचा कट आखल्याबाबत मला संशय असल्याचे कयानी यांनी अमेरिकी अभ्यासकाला सांगितले. २००७ मध्ये घडलेल्या या हत्याकांडानंतर लगेचच मुशर्रफ सरकारने हत्याकटासाठी तालिबानला जबाबदार धरले होते. मेहसूदने केलेल्या दूरध्वनींच्या आधारावर हा दावा करण्यात आला होता, जो अपूर्ण असल्याचे कयानी यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानमध्ये असलेल्या अमेरिकी राजदूताने या हत्याकटाबाबत प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये हा दावा करण्यात आला असून, त्यातील कयानी प्रकरण प्रकाशित करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Aug 2013 रोजी प्रकाशित
मुशर्रफ यांच्यावर भुत्तोहत्येचे ‘भूत’
बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांच्यावर मंगळवारी अभियोग दाखल करण्यात आला.
First published on: 21-08-2013 at 04:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan pervez musharraf charged with benazir bhuttos murder