पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. परंतु इम्रान खान यांच्या या निर्णयानंतर पुन्हा एकदा ते एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे. पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे.
बाजवा याचा कार्यकाळ तीन वर्षांनी वाढवण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल. तसेच पाकिस्तानी लष्कर हे केवळ एक किंवा दोन जणांवरच अवलंबून असल्याचा संदेश जगभरात पसरेल, असे मत विरोधीपक्षांकडून व्यक्त करण्यात आले आहे. बाजवा यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या घेण्यात आलेल्या निर्णयामुळे अन्य अधिकाऱ्यांचे मनोबलावरही त्याचा परिणाम होईल आणि लोकांमध्येही चुकीचा संदेश जाईल, असं मत पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रवक्ते फरहतुल्ला बाबर यांनी व्यक्त केलं.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यामुळे सध्या भारत-पाकिस्तानमध्ये मोठया प्रमाणावर तणाव आहे. पाकिस्तानकडून युद्धाचे इशारे दिले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख म्हणून बाजवा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. कमर जावेद यांचा काश्मीर आणि उत्तर भागातील समस्यांचा दांडगा अनुभव आहे. जनरल कमार जावेद बाजवा रावळपिंडी तुकडीचे कमांडर होते. ते ट्रेनिंग आणि मूल्यमापन विभागाचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते.माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये जनरल बाजवा यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती केली होती. भारताने काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर बाजवा यांच्या नेतृत्वाखाली रावळपिंडीमध्ये पाकिस्तानी लष्कराची एक बैठक झाली. त्यामध्ये संघर्षाच्या या काळात पाकिस्तानी लष्कर ठामपणे काश्मिरी जनतेच्या पाठिशी उभे असून काश्मीरसाठी आम्ही कुठल्याही पातळीपर्यंत जाऊ असे टि्वट पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आले होते.
