Pakistan Shown Readiness For Talks With India: पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी शुक्रवारी सांगितले की, पाकिस्तान काश्मीर आणि इतर सर्व प्रलंबित मुद्द्यांवर भारताशी चर्चा करण्यास तयार आहे. इस्लामाबादमधील पाकिस्तानी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना दार म्हणाले, “जेव्हा केव्हा चर्चा होईल तेव्हा ती फक्त काश्मीरवरच नाही तर सर्व मुद्द्यांवर असेल.”
दुसरीकडे, भारताने हे आधीच स्पष्ट केले आहे की, भारत पाकिस्तानशी फक्त पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरच चर्चा करेल.
दार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे की, भारतासोबत चर्चा कोणत्याही एका मुद्द्यावर होणार नाही. ते म्हणाले की पाकिस्तानने कोणत्याही मध्यस्थीची विनंती केलेली नाही परंतु त्यांना तटस्थ ठिकाणी बैठकीचा प्रस्ताव देण्यात आला होता. “आम्हाला तटस्थ ठिकाणी बैठकीतसाठी बोलवण्यात आले आणि जर तसे असेल तर आम्ही बैठकीसाठी तयार आहोत”, असे त्यांनी म्हटले.
इशाक दार यांनी हे देखील मान्य केले की, त्यांना अमेरिकेकडून भारतासोबत शस्त्रवरामासाठी फोन आला होता आणि त्यांनी अमेरिकेला सांगितले होते की, पाकिस्तानला भारतासोबत युद्ध नको आहे.
“मला अमेरिकेकडून शस्त्रविरामासाठी फोन आला होता. त्यावेळी मी स्पष्ट केले होते की पाकिस्तानला युद्ध नको आहे”, असे दार म्हणाले.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ७ मे रोजी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत अचूक हल्ले करत ते उद्ध्वस्त केले होते. भारताच्या कारवाईनंतर, पाकिस्तानने ८, ९ आणि १० मे रोजी भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याला भारतीय सैन्याने अनेक पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांवर जोरदार हल्ले करत प्रत्युत्तर दिले होते.
चार दिवस चाललेला लष्करी संघर्ष शस्त्रविरामानंतर १० मे रोजी संपुष्टात आला होता. त्यांनी सांगितले की, भारतासोबतचा शस्त्रविराम करार अजूनही कायम आहे.
दरम्यान भारत रशियन तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे. याचबरोबर त्यांनी पाकिस्तानबरोबर जवळीक वाढवल्याचे दिसत आहे. याचाच भाग म्हणून अलिकडेट पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी दोन वेळा अमेरिकेचा दौरा केला आहे. तसेच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तान दौरा करणार असल्याची चर्चा आहे. यावर स्पष्टीकरण देताना पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तान दौरा अद्याप नियोजित नसल्याचेही सांगितले.