कुख्यात आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात नसल्याचा कांगावा पाकिस्तानकडून पुन्हा करण्यात आला आहे. शिंदे यांनी शुक्रवारी दाऊद पाकिस्तानमध्ये असल्याचे म्हटल्यानंतर पाककडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या तसनीम अस्लम म्हणाल्या, ”आम्ही पुन्हा एकदा भारताला सांगतो की दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. आम्ही नव्याने दाऊद पाकिस्तानमध्ये असल्याची तपासणी केली आहे आणि तो पाकिस्तानमध्ये नाही.”
आमच्या माहितीप्रमाणे दाऊद पाकिस्तानातच आहे, असे सुशीलकुमार शिंदे नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत  म्हणाले होते.  आपण गेल्या वर्षी अमेरिकेत गेलो असताना तेथील अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाशी चर्चा केली तसेच एफबीआयसाठी काम करणाऱ्या महाधिवक्त्यांशी चर्चा केली. दाऊदबाबत एकमेकांना असलेल्या माहितीची देवाणघेवाण  करण्याचे आम्ही ठरवले होते. भारताला हवे असलेले हे गुन्हेगार एक-एक करून भारतात आणले जातील, सर्व येतील फक्त वाट पाहा, अशी विनंती शिंदे यांनी शुक्रवारी केली.
१९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे ती अजून प्रलंबित आहे. अमेरिकेच्या मते दाऊदचे अल काईदा या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत. अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी जाहीर केले आहे व त्या प्रकरणाचा संयुक्त राष्ट्रांकडे पाठपुरावाही केला आहे. दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांच्या गृहमंत्रिपदाच्या काळात सय्यद झैबुद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल, फसिह महमूद ऊर्फ फसिह महंमद अब्दुल करीम टुंडा व यासिन भटकळ यांना भारतात आणण्यात यश मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan shrugs off indias claim again says dawood not present in country
First published on: 11-01-2014 at 03:28 IST