Polymer Plastic Notes in Pakistan: पाकिस्तानमधील अर्थव्यवस्थेबाबत आंतरराष्ट्रीय समुदायानंही अनेकदा चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानला आर्थिक आधार मिळावा, यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांकडूनम मोठ्या प्रमाणावर कर्जाच्या स्वरुपात रक्कम व आर्थिक मदतही पाकिस्ताननं घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेनं एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये आता पॉलिमर प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याची घोषणा स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद यांनी केली आहे. पीटीआयनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

बनावट नोटांची पाकिस्तानला चिंता!

दरम्यान, पाकिस्तानमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट झाला असून त्यावर तोडगा काढण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे. या बनावट नोटांमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होत असल्याची टीकाही विरोधकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर बनावट नोटांना आळा घातला जावा, सहजासहजी बनावट नोटा तयार करता येऊ नयेत यासाठीचे पर्याय प्रशासनाकडून तपासले जात होते. यानंतर अखेर पॉलिमर प्लास्टिकपासून बनवलेल्या नोटा चलनासाठी वापरण्याचा निर्णय स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद यांनी जाहीर केला आहे.

जमील अहमद यांनी पाकिस्तानच्या संसदेतील बँकिंग व फायनान्स विषयाशी निगडित समितीसमोर यासंदर्भातली माहिती दिली आहे. सध्या अर्थव्यवस्थेत वापरात असणाऱ्या कागदाच्या नोटासाठीचा नवा पर्याय तयार केला जात असून त्यामध्ये सुरक्षेसंदर्भातल्या अनेक गोष्टींचा अंतर्भाव केला जाणार आहे. या वर्षी डिसेंबर महिन्याच्या आत या नोटा बाजारात येतील, असंही त्यांनी सांगितलं.

५००० रुपयांचीही नोट!

दरम्यान, पॉलिमर प्लास्टिकचा वापर करून बनवण्यात येणाऱ्या नोटांमध्ये ५००० रुपयांच्या नोटेचाही समावेश असेल, असं सांगितलं जात आहे. या नोटा प्रामुख्याने रुपये १०, ५०, १००, ५००, १००० आणि ५००० अशा मूल्याच्या असतील.

Internet in Pakistan: पाकिस्तानात इंटरनेटचा वेग मंदावल्याने हाहाकार… कारणे काय? परिणाम काय?

जुन्या कागदी नोटा पुढची पाच वर्षं चलनात राहतील. तोपर्यंत त्या टप्प्याटप्प्याने अर्थव्यवस्थेतून बाद करण्याची प्रक्रिया चालू राहील, अशी माहितीही जमील अहमद यांनी दिली आहे. सगळ्यात आधी एकाच मूल्याच्या दरातील नोटा बाजारात दाखल होती. त्या जनतेनं स्वीकारल्यानंतर, लोकांनी त्यांचा नियमित वापर सुरू केल्यानंतर इतर मूल्यांच्या नोटाही बाजारात आणल्या जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या जगभरातले जवळपास ४० देश राष्ट्रीय चलन म्हणून पॉलिमर प्लास्टिकच्या नोटांचा वापर करतात. या प्रकारच्या नोटांच्या नकली नोटा बनवणं कठीण असून त्यात होलोग्राम व इतर सुरक्षेच्या उपाययोजना अधिक सक्षम असल्याचं मानलं जातं.