अमेरिकन तत्वज्ञ, विचारवंत आणि भारतातील हिंदू संस्कृतीचे अभ्यासक डॉ. डेव्हिड फ्रॉली यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. स्वत:च्या देशातून हिंदूना हद्दपार करणाऱ्या पाकिस्तानला आता काश्मीरची चिंता कशासाठी सतावत आहे असा टोला फ्रॉली यांनी लगावला आहे. हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर वामदेव शास्त्री या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या डेव्हिड यांनी पाकिस्तान काश्मीरसंदर्भात भारताने घेतलेल्या निर्णयानंतर या विषयावर गरज नसताना वाद निर्माण करु पाहत असल्याचे म्हटले आहे.

कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतावर आगपाखड केली होती. ‘कलम ३७० रद्द करणे हा भारताचा डाव आहे. या निर्णयाच्या माध्यमातून काश्मीरमधील लोकसंख्येचे प्रमाण बदलून हिंदूंचे प्रमाण वाढवण्याचा हा प्रयत्न आहे,’ अशी टिका पाकिस्तानकडून करण्यात आली. याच टिकेला आता पद्मभूषण पुरस्कार विजेते डेव्हिड यांनी ट्विट करुन सडेतोड उत्तर दिले आहे.

डेव्हिड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील लोकसंख्येचे संतुलन आधीच बदलले आहे. त्यांनी या भागामध्ये दहशतवाद्यांची संख्याही भरमसाठ वाढवली आहे. काही मोजकी उदाहरणे सोडता बहुतांश हिंदूंना त्यांनी हाकलवून लावले असून पाकिस्तानमधल्या लोकसंख्येचे संतुलनही बिघडवले आहे. एवढं सगळं स्वत:च्या देशात करुन आता त्यांना काश्मीरमधील लोकसंख्येचं संतुलन बिघडेल अशी चिंता लागली आहे.’

नक्की वाचा >> ‘हिंदू धोकादायक आणि अत्याचार करणारे असतील तर..’ अमेरिकन विचारवंताचे ट्विट व्हायरल

दरम्यान याआधीही डेव्हिड यांनी हिंदूंच्या समर्थनार्थ ट्विट केले आहेत. हिंदू संस्कृती, फल ज्योतिष आणि आयुर्वेद या विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या डेव्हिड यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. ते अमेरिकेतील साण्टा शहरामध्ये अमेरिकन वैदिक इन्स्टीट्यूट या संस्थेच्या माध्यमातून वैदिक पुराण आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करण्याचे काम करतात.