केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात आपल्या देशाचं ‘इंडिया’ हे नाव हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. देशाचं नाव इंडियाऐवजी ‘भारत’ असं केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

देशात ‘इंडिया’ हे नाव हटवण्याची चर्चा सुरू असतानाच पाकिस्तान ‘इंडिया’ या नावावर दावा सांगू शकतो, अशी चर्चा पाकिस्तानमधील स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे. यावरून भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनी पाकिस्तानला टोला लगावला आहे. “गाव वसलं नाही, तोपर्यंत भिकारी आले”, अशा अर्थाचा टोला वीरेंद्र सेहवागने लगावला.

खरं तर, वीरेंद्र सेहवागने’साऊथ एशिया इंडेक्स’चं एक ट्वीट रीट्वीट केलं आहे. संबंधित ट्वीटमध्ये स्थानिक मीडियाच्या हवाल्याने साऊथ एशिया इंडेक्सने म्हटलं, “भारताने जर संयुक्त राष्ट्रामध्ये अधिकृतपणे ‘इंडिया’ हे नाव रद्द केलं, तर पाकिस्तानकडून “इंडिया” नावावर दावा केला जाऊ शकतो. कारण पाकिस्तानमधील उजव्या विचारसरणींच्या लोकांनी दीर्घकाळापासून ‘इंडिया’ नावावर आपला दावा सांगितला आहे. कारण या नावातून सिंधू (Indus) प्रदेशाचा संदर्भ येतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संबंधित ट्वीट रीट्वीट करताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “गाव वसलं नाही तोपर्यंत…” अन्य एका ट्वीटमध्ये विरू म्हणाला, मला राजकारणात बिलकूल रस नाही. मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये देशातल्या दोन्ही मोठ्या पक्षांनी (भाजपा आणि काँग्रेस) माझ्याशी संपर्क साधला होता. परंतु, मला असं वाटतं की मनोरंजन क्षेत्रातील लोकांनी आणि खेळाडूंनी राजकारणात येऊ नये. कारण त्यांच्यापैकी बहुतेकजण हे त्यांच्या वैयक्तिक महत्त्वकांक्षा आणि सत्तेच्या भूकेपायी राजकारणात येतात आणि क्वचितच लोकांना वेळ देतात. याला काही अपवाद आहेत. परंतु, यातले बहुसंख्य लोक फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी राजकारणात येतात.”