पाकिस्तानची अर्थव्यवस्था आगामी १० वर्षांत उद्ध्वस्त होईल आणि ग्रीसच्या अर्थव्यवस्थेसारखी अवस्था होईल, असा इशारा पाकिस्तानचे शिक्षणमंत्री मेहताब हुसैन यांनी कराचीत एका आर्थिक विकासविषयक परिषदेत दिला आहे. देशात जबरदस्त सामाजिक विषमता आहे. ती लवकरात लवकर दूर करणे गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. यावेळी पाकिस्तान इन्स्टिट्युट ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचे कुलगुरू डॉ. असद जमान यांनी भारत-पाकिस्तान संबंधांबाबत आपली मते मांडली. भारतासोबत असलेला तणाव आपल्या देशासाठी नुकसानकारक आहे, असे ते म्हणाले.
एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ट्रान्सफॉर्मिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट’ मध्ये हुसैन यांनी हा इशारा दिला आहे. येत्या दहा वर्षांत पाकिस्तानची अर्थव्यवस्था ग्रीसच्या अर्थव्यवस्थेसारखी उद्ध्वस्त होईल. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता आहे. देशातील समाज धनाढ्य आणि गरिबांमध्ये विभागला गेला आहे, असे हुसैन म्हणाले. इतर देशांच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे पुढे वाटचाल करायची असेल तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय विकासाचे ध्येय साध्य करावे लागेल आणि त्यासाठी आपल्या परिस्थितीनुसार त्या बाबी दुरुस्त कराव्या लागतील, असेही ते म्हणाले.
पाकिस्तान सध्या अनेक आव्हानांचा सामना करत आहे. त्यात गरिबी, भ्रष्टाचार, निरक्षरता, असमानता, बेरोजगारी आणि प्रशासनाशी संबंधित अनेक मुद्दे आहेत. या कारणांमुळे देशाचा आर्थिक विकास आणि विकासाच्या गतीवर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी एईआरसी (अॅप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च सेंटर)च्या संचालक प्राध्यापक समीना यांनीही आपली मते मांडली. पाकिस्तान सामाजिक आणि आर्थिक वादळाच्या दिशेने जात आहे. त्यामुळे मोठी हानी होईल, अशी भीती आहे. हे आर्थिक वादळ सध्याची अर्थव्यवस्था आणि पाकिस्तानच्या भवितव्याला उद्ध्वस्त करीन, असे समीना म्हणाल्या. यावेळी पाकिस्तान इन्स्टिट्युट ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचे कुलगुरू डॉ. असद जमान यांनी भारत-पाकिस्तान संबंधांबाबत आपली मते मांडली. भारतासोबत असलेला तणाव आपल्या देशासाठी नुकसानकारक आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तानने व्यापारी धोरण आणि आत्मनिर्भरतेबाबत पुन्हा विचार करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.