Asim Munir Gifting fake photo: पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना नुकतीच फिल्ड मार्शलपदी बढती देण्यात आली. आता असीम मुनीर यांना जगभरातून ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानी सैन्यदलाच्या वतीने आयोजित एका खास कार्यक्रमात असीम मुनीर यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना ऑपरेशन बुनियानची तस्वीर भेट देण्यात आली. भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरला प्रतिकार म्हणून पाकिस्तानने ही मोहीम राबविली होती. मात्र सदर तसबीर ऑपरेशन बुनियानची नसल्याचे अनेकांनी सप्रमाण उघड केले असून पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली आहे.

असीम मुनीर यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना दिलेली तसबीर ही भारताविरोधातील मोहिमेची नसून चीनच्या २०१९ साली लष्करी हल्ल्याची आहे. पाकिस्तानी सैन्यदलाच्या साहसाचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ही तसबीर फ्रेम करून पंतप्रधानांना देण्यात आली आहे.

सैन्यदलाने आयोजित केलेल्या जेवणाच्या कार्यक्रमाला अनेक राजकारणी आणि सैन्य दलातील उच्च अधिकारी उपस्थित होते. यात राष्ट्रपती आशिफ अली झरदारी, पंतप्रधान शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री इसाक दर आणि संसदेचे अध्यक्ष युसुफ रझा गिलानी यांची उपस्थिती होती.

व्हायरल होणारी तसबीर कोणती?

भारताला प्रत्युत्तर देण्याच्या नादात पाकिस्तानने खालची पातळी गाठल्याची टीका आता होत आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे अचूक अशी लष्करी कारवाई केली. पण पाकिस्तानने त्याला एका फेक फोटोने उत्तर दिल्याचे म्हटले जात आहे.

भाजपा नेते बीएल श्रीनिवास सोलंकी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, पाकिस्तानने लष्करी क्षेत्राचा नीचांक गाठला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख पंतप्रधानांना चीनी रॉकेट ड्रिलचा फोटो भेट देतात. ज्यात ऑपरेशन बुनियानचा उल्लेख केलेला आहे. तुमच्या कथित विजयासाठी तुम्ही जेव्हा बिजिंगच्या फोटोंचा वापर करता तेव्हा हा रणनीतीचा नाही तर आंतरराष्ट्रीय नाचक्कीचा विषय होतो.

असीम मुनीर यांनी दिलेला फोटो इंटरनेटवर तपासल्यास तो चीनचा असल्याचे गुगलवर सहज दिसून येत आहे. चीनच्या संरक्षण दलानेही २०१९ साली हा फोटो शेअर केला होता. एका युजरने पाकिस्तानला ट्रोल करताना म्हटले की, भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्याचे अचूक आणि नेमके पुरावे दिले असताना पाकिस्तानने मात्र चीनचा फोटो वापरून स्वतःची पाठ थोपटवून घेण्याचा केविलवाणा प्रकार केलेला दिसून येत आहे.

भारताने पहलगामवरील अतिरेकी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्ताननेही असंख्य ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र भारतावर डागली. मात्र भारताच्या हवाई दलाने त्याला हवेतच निकामी केले. पाकिस्तानकडून दिलेल्या प्रत्युत्तराला ऑपरेशन बुनियान असे नाव दिले गेले होते.