Pakistan’s minister Attatullah Tarar Statement: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी केली होती. तसेच मंगळवारी (२९ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सशस्त्र दलाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीनंतर पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी भारताकडून लष्करी कारवाई होण्याची भीती व्यक्त केली आहे. या कारवाईबाबतची विश्वसनीय माहिती आमच्याकडे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी एक्स माध्यमावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले, “पुढच्या २४ ते ३६ तासांत भारताकडून पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करणार असल्याची आमच्याकडे विश्वसनीय माहिती आहे. पहलगाममधील घटनेत पाकिस्तानचा निराधार संबंध जोडून हा हल्ला करण्याचा विचार भारताकडून केला जात आहे.”
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मागच्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊले उचलत त्यांची कोंडी केली. दरम्यान पाकिस्तानने मात्र पहलगाम घटनेपासून स्वतःचे हात झटकले आहेत.
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी करत असताना भारताने नवी दिल्लीतील १०० हून अधिक विदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांना हल्ल्याची माहिती दिली. तसेच जागतिक नेत्यांशीही चर्चा करून याबाबत कळवले.
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीत दहशतवादी हल्ल्याला लष्करी कारवाईद्वारे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हिरवा कंदिल दाखविला. दहशतवाद चिरडून टाकण्यासाठी कधी, कुठे आणि केव्हा लष्करी कारवाई करायची, याचे संपूर्ण स्वातंत्र्य संरक्षण दलांना असेल, असा स्पष्ट आणि थेट संदेश पंतप्रधान मोदींनी दिल्याचे समजते. या बैठकीनंतर काही तासातच पाकिस्तानचे मंत्री तरार यांनी आपली भीती व्यक्त केली.
अत्तातुल्लाह तरार पुढे म्हणाले की, पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी ठरलेला आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याचे दुःख त्यांना समजते. जगात ज्या ज्या ठिकाणी दहशतवादाचा प्रकार घडतो, त्या प्रत्येक घटनेबाबत आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे. पहलगाम हल्ल्याची संयुक्त चौकशी करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने दिला होता, अशीही माहिती तरार यांनी दिली.
भारताने लष्करी कारवाई केल्यास त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही अत्तातुल्लाह तरार यांनी दिला. भारताने लष्करी कारवाईचे धाडस केल्यास पाकिस्तानकडूनही त्याला तसेच उत्तर देण्यात येईल. यासह त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायालाही आवाहन केले आहे. वाढत्या तणावाची आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी भारतावर असेल, असेही तरार आपल्या निवेदनात म्हणाले.