प्रेमभंगाचा सूड उगवण्यासाठी एका प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या घरात बॉम्ब लपवून ठेवले. पोलिसांनी प्रियकराच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे.
हरियाणामधल्या पालवाल जिल्ह्यात राहणा-या आरती या ३५ वर्षीय महिलेने आपल्या माजी प्रियकरासोबत मिळून प्रियकराच्या हत्येचा कट रचला. आरती आणि तिचा माजी प्रियकर प्रदिप या दोघांनी आरतीच्या प्रेमभंगाचा सूड उगवण्यासाठी तिचा प्रियकर राकेश याच्या घरात तीन बॉम्ब लपवून ठेवले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हे गावठी बॉम्ब बनवले होते. पोलिसांना याचा सुगावा लागताच बॉम्बविरोधी पथक राजेशच्या इमारतीत दाखल झाले आणि त्यांनी तिन्ही बॉम्ब निकामी केले. कोणाच्याही सहज लक्षात येणार नाही अशा ठिकाणी आरती आणि प्रदिपने हे बॉम्ब लपवून ठेवले होते. जवळपास ४ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बॉम्ब विरोध पथकाला हे बॉम्ब निकामी करण्यात यश आले.
आरती आणि राकेश यांचे विवाहबाह्य संबध होते. राकेश आपल्या पत्नी आणि मुलांना सोडून आरतीसोबत राहत होता. परंतु राकेशच्या नातेवाईकांपैकी एक असलेल्या बापू लाल या ६५ वर्षांच्या वृद्धाने राकेश आणि त्याच्या पत्नीत समेट घडवून आणला. त्यानंतर राकेश आरतीला सोडून आपल्या पत्नी आणि मुलांकडे परत राहायला गेला. याच रागातून आरतीने प्रेमभंगाचा बदला घ्यायचा ठरवला. त्यानंतर आपल्या माजी प्रियकरासोबत मिळून तिने राकेशच्या हत्येचा कट रचला. प्रदीपला फटाके कसे बनवतात हे माहित होते. त्यामुळे आरतीने प्रदिपला हाताशी धरून तीन गावठी बॉम्ब बनवून घेतले. पण राकेशला मारण्यापूर्वी आरती आणि प्रदिप या दोघांनी मिळून बापू लाल यांची देखील हत्या केली. बापू लाल आपल्या प्रेमभंगासाठी कारणीभूत असल्याने तिने ३ ऑक्टोबरला त्यांची देखील हत्या केली.
पोलिसांनी या दोघांनाही खूनाच्या आरोपावरून आणि हत्येच्या कटात सहभागी झाले म्हणून अटक केली आहे. प्रदिप हा हरियाणामधल्या सराईत गुन्हेगारांपैकी एक आहे. याआधीही त्याला अनेकदा खुनाच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. खून, हत्येचा प्रयत्न, खंडणी वसुली, अपहरण यासारखे अनेक आरोप त्याच्यावर आहे. यातल्या एका हत्येमध्ये आरतीनेही त्याला मदत केल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palwal womans plan to avenge broken heart blow up ex boyfriend to pieces
First published on: 12-10-2016 at 11:02 IST