SC on Pan India Fire Cracker Ban: देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर फटाक्यांसंदर्भातल्या एका प्रकरणाची सुनावणी चालू आहे. या सुनावणीवेळी भूषण गवई यांनी सरसकट देशभरात फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत मत व्यक्त केलं. दिवाळी अवघ्या महिन्याभरावर आलेली असताना देशाच्या सर्वोच्च न्यायालयात फटाक्यांवर देशव्यापी बंदी घालण्याबाबत सुनावणी चालू असल्यामुळे फटाके उत्पादक, वितरक आणि ग्राहक अशा तिघांचंही लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे. विशेषत: फक्त राजधानी दिल्लीसंदर्भात ही बंदीची याचिका सुनावणीसाठी आलेली असताना सरन्यायाधीश गवईंनी त्यावरूनही परखड मत व्यक्त केलं.

नेमकं काय आहे प्रकरण?

राजधानी दिल्लीतील प्रदूषण ही एक मोठी समस्या दरवर्षी चर्चेला येत असते. एकीकडे दिवाळीमुळे फटाक्यांचा होणारा धूर आणि दुसरीकडे पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये कडबा जाळल्याने होणारा धूर यामुळे दिल्लीमध्ये दरवर्षी या काळात वायू प्रदूषणाची मोठी समस्या उद्भवते. त्यामुळे अनेकदा सरकारला रस्त्यावर येणारी वाहने मर्यादित करण्यासारखी पावलेही उचलावी लागतात. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात दिल्लीत फटाक्यांवर बंदी घातली जावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल झाली असून त्यावर सुनावणी चालू आहे.

शुक्रवारी या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी फक्त दिल्लीसाठीच बंदी का? संपूर्ण देशभरासाठी बंदी घातली जायला हवी, अशी ठाम भूमिका मांडली. “जर दिल्लीतल्या नागरिकांना स्वच्छ हवेचा अधिकार असेल, तर मग इतर शहरांमधल्या नागरिकांनाही तसा अधिकार का नाही?” असा सवाल सरन्यायाधीशांनी उपस्थित केला आहे.

फक्त दिल्लीसाठी धोरण ठरवता येणार नाही – सरन्यायाधीश भूषण गवई

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात याचिका फक्त दिल्लीसाठी दाखल झाली असली, तरी फटाक्यांवरील बंदी फक्त दिल्लीसठी लागू करता येणार नाही, असं सरन्यायाधीश सुनावणीवेळी म्हणाले. “दिल्लीतले नागरिक देशातले उच्चभ्रू असल्याचं मानून आपल्याला फक्त दिल्लीसाठी फटाके बंदीचं धोरण आखता येणार नाही. गेल्या वर्षी मी अमृतसरमध्ये होतो. तिथलं वायू प्रदूषण हे दिल्लीपेक्षा भयानक आहे. जर फटाक्यांवर बंदी घालायची असेल, तर ती संपूर्ण देशात घातली जायला हवी”, असं सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले.

सरन्यायाधीशांच्या या टिप्पणीवर वरीष्ठ वकील अपराजिता सिंग यांनी दुजोरा दिला. “उच्चभ्रू मंडळी त्यांची काळजी करू शकतात. जेव्हा प्रदूषण वाढतं, तेव्हा ही मंडळी दिल्लीच्या बाहेर जातात”, असं त्यांनी नमूद केलं.

सर्वोच्च न्यायालयाचे CAQM ला आदेश

यानंतर सरन्यायाधीश भूषण गवईंनी प्रदूषण नियामक आयोगाला (CAQM) देशभर फटाक्यांवर बंदी घालण्यासंदर्भात भूमिका मांडण्यासाठी नोटीस बजावली. याआधीही अशा प्रकारे फटाक्यांवर बंदीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. राजधानी दिल्ली व सीमेवरच्या काही भागात पूर्णपणे बंदी, एनसीआरच्या भागात काही प्रमाणात बंदी व विक्री आणि साठवणुकीवर निर्बंध अशा प्रकारच्या आदेशांची अंमलबजावणी याआधी करण्यात आली आहे.