मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना काळ्या पैशांबद्दलच्या एका महत्त्वपूर्ण तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. भारतासह जगभरातील अनेक बलाढ्य कंपन्या आणि सामर्थ्यशाली व्यक्तींच्या काळ्या पैशाबद्दलची माहिती यामुळे उघडकीस आली आहे. यामध्ये भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हांसोबतच भाजपचे राज्यसभेतील खासदार रवींद्र किशोर (आर. के.) सिन्हा यांच्या नावाचा समावेश आहे. याबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारताच, आपले मौनव्रत सुरु असल्याचे सिन्हा यांनी खाणाखुणा करुन सांगितले.
पॅराडाईज पेपर्समध्ये नाव आल्याने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार आर. के. सिन्हा यांना याबद्दल प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी मान नकारार्थी हलवली आणि कोणतेही उत्तर द्यायचे नसल्याचे खुणेने पत्रकारांना सांगितले. यानंतर त्यांनी पत्रकारांकडून एक पेन मागितला आणि कागदावर ‘भागवत महायज्ञासाठी ७ दिवसांचे मौनव्रत आहे,’ असा संदेश लिहून तो पत्रकारांनी दाखवला.
#WATCH: BJP MP Ravindra Kishore Sinha's reaction on being asked about a news report of his security firm being linked to 2 offshore entities pic.twitter.com/AryNIJdq8h
— ANI (@ANI) November 6, 2017
२०१४ मध्ये बिहारमधून राज्यसभेवर गेलेले आर. के. सिन्हा भाजपच्या धनाढ्य नेत्यांपैकी एक आहेत. सिन्हा यांची कंपनी एसआयएस सिक्युरिटीजचे नाव ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये आले आहे. या कंपनीच्या परदेशात दोन उपकंपन्या आहेत. माल्टा रजिस्ट्रीच्या नोंदीनुसार, एसआयएस सिक्युरिटीजची सहाय्यक कंपनी एसआयएस एशिया पॅसिफिक होल्डिंग्सची (SAPHL) नोंदणी २००८ मध्ये करण्यात आली. सिन्हा यांची पत्नी रीत किशोर या कंपनीच्या संचालक पदावर आहे. याशिवाय, एसआयएस इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (SIHL) ही कंपनी ब्रिटिश वर्जिन द्विप समूहात सहभागी आहे. या कंपनीचे SAPHL मध्ये जवळपास ४० लाख समभाग आहेत. माल्टा रजिस्ट्रीकडून १३ ऑक्टोबर २००८ मिळालेल्या कागदपत्रांनुसार, SAPHL च्या साधारणत: १४९९ समभागांची मालकी माल्टाच्या पीसीएल इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेडकडून एसआयएस इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेडकडे हस्तांतरित करण्यात आली होती.
पॅराडाईज पेपर्समध्ये एकूण १८० देशांमधील कंपन्या आणि लोकांची नावे आहेत. पॅराडाईज पेपर्समध्ये देशातील ७१४ लोकांचा समावेश असून जगभरात भारत १९ व्या क्रमांकावर आहे. केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा, बिग बी अमिताभ बच्चन, उद्योगपती विजय मल्ल्या, अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावेदेखील यामधून समोर आली आहेत.