scorecardresearch

युक्रेनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नवीनचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्याचा निर्णय, नवीनच्या पालकांची माहिती

युक्रेन-आणि रशिया यांच्यातील युद्धादरम्यान तोफमाऱ्यामध्ये नवीनचा दोन आठवड्यांपूर्वी मृत्यू झाला होता.

naveen photo
नवीन ज्ञानगौडा (फाईल फोटो)

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनच्या खार्किव्ह शहरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नवीन ज्ञानगौडा या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. नवीनचे पार्थिव बंगळुरूमध्ये २१ मार्च रोजी आणले जाणार असल्याचे त्याचे वडील शेखरप्पा ज्ञानगौडा यांना कळवण्यात आले आहे. त्यानंतर नवीनच्या कुटुंबीयांनी हा निर्णय घेतलाय.

युक्रेनआणि रशिया यांच्यातील युद्धामध्ये जेवण आणण्यासाठी गेलेल्या नवीनचा दोन आठवड्यांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर युद्धभूमीवरुन नवीनचे पार्थिव भारतात आणण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालय तसेच युक्रेनमधील भारतीय दूतावास यांच्याकडून प्रयत्न सुरु होते. नवीनच्या मृत्यूची बातमी आल्यापासून त्याचे कुटुंबीय नवीनच्या पार्थिवाची पाट पाहत आहेत. दरम्यान, नवीनला शेवटचे एकदा पाहता येणार हे समजल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नवीनचे पार्थिव वैद्यकीय महाविद्यालया देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीनचे पार्थिव एस.एस. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटरला या वैद्यकीय महाविद्यालयाला दिले जाणार आहे.

याबाबत बोलताना, “आम्ही आमच्या मुलाचा चेहरा पाहू शकू की नाही, असा प्रश्न आम्हाला पडला होता. मात्र राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे आम्हाला मुलाला पाहता येणार आहे. आम्ही नवीनच्या पार्थिवाची पूजाअर्चा करु. त्यानंतर नवीनचा मृतदेह आम्ही वैद्यकीय महाविद्यालयाला दान करु,” असं नवीनचे वडील शेखरप्पा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, नवीनचे पार्थिव २१ मार्च रोजी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे तीन वाजता पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करुन पार्थिव नवीनच्या कुटुंबीयांकडे सोपवले जाणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parents of medical student naveen who killed in ukraine will give naveen body to medical college prd

ताज्या बातम्या