Premium

‘संसद उद्घाटन मोदींच्या दृष्टीने राज्याभिषेक’, राहुल गांधींसह विविध विरोधी पक्षांची टीका

पंतप्रधान मोदींनी नव्या संसद भवनाचे रविवारी उद्घाटन केल्यानंतर राहुल यांनी हिंदीत केलेल्या ‘ट्वीट’द्वारे हे टीकास्त्र सोडले.

rahul gandhi criticism modi Coronation
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पीटीआय, नवी दिल्ली : ‘संसद हा जनतेचा आवाज आहे. पंतप्रधान मात्र संसद भवन उद्घाटन सोहळय़ाला स्वत:चा राज्याभिषेक मानत आहेत,’ अशी बोचरी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 पंतप्रधान मोदींनी नव्या संसद भवनाचे रविवारी उद्घाटन केल्यानंतर राहुल यांनी हिंदीत केलेल्या ‘ट्वीट’द्वारे हे टीकास्त्र सोडले. विरोधी पक्षांनीही मोदींना आपल्या टीकेचे लक्ष्य केले. मोदी हे आत्मसंतुष्ट असल्याचा आरोप करून विरोधकांनी नमूद केले, की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या ऐतिहासिक सोहळय़ापासून दूर ठेवले गेले. यावरून भाजपची व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दलित, आदिवासी आणि ‘ओबीसी’विरोधी भूमिका उघड होते. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले, की राष्ट्रपतीपद भूषवणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांना त्यांचे घटनात्मक कर्तव्य बजावू दिले जात नाही.

काँग्रेसचे संघटनात्मक सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ‘ट्वीट’ केले, की तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नवीन संसद भवनाच्या पायाभरणी सोहळय़ापासून दूर ठेवले होते. आता संसद भवनाच्या उद्घाटन सोहळय़ात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बाजूला ठेवण्यात आले. ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागास समाजाच्या विरोधातील उच्चवर्णीय विचारसरणी आहे. कोविंद आणि मुर्मू यांना सर्वोच्च संवैधानिक पदावर असतानाही योग्य तो सन्मान न देण्यामागे हेच कारण आहे.

डाव्या पक्षांकडूनही टीकास्त्र

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी ‘ट्वीट’ केले, की हा उद्घाटन सोहळा ‘नव्या भारता’ची घोषणा देत चुकीच्या प्रचाराचा जोरदार हंगामा करून आयोजित केला होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) खासदार विनय विश्वम म्हणाले, की संसदभवनात काय होणार आहे, हे पहिल्यापासून माहित होते. निर्दयी फॅसिस्ट हुकूमशाही निरंकुश मार्गाने चालली आहे. पंतप्रधान सावरकरांपुढे नतमस्तक झाले तेव्हा देशाला सावरकरांनी ब्रिटिशांकडे केलेल्या दयेच्या अर्जाची आठवण झाली. मोदी नवीन संसदेचा वापर अदानी आणि थेट विदेशी गुंतवुणुकीसाठी करतील. आम्ही याविरुद्ध सतत संघर्ष करत राहू. कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्‍सवादी-लेनिनवादी) सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य यांनी ‘ट्वीट’ केले, की एकीककडे दिल्लीतील महिला सन्मान पंचायतीत जमलेल्या महिला कुस्तीपटू आणि इतर नागरिकांना क्रूर वागणूक दिली जात आहे. तर दुसरीकडे नवीन संसद भवनाचे उद्घाटन हे एखाद्या राजाच्या राज्याभिषेकाप्रमाणे होत आहे. एकीकडे लोकशाहीवर क्रूर हल्ला होत आहे, तर दुसरीकडे घटनात्मक भावना आणि दृष्टिकोनावर गप्पा मारल्या जात आहेत.

‘बसप’कडून मात्र शुभेच्छा!

बहुजन समाज पक्षाच्या (बसप) अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी रविवारी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी शुभेच्छा दिल्या. या भवनाचा वापर पवित्र राज्यघटनेनुसार देशाच्या आणि जनतेच्या हितासाठी झाला तर ते औचित्यपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सत्तेचे हस्तांतरण जनतेच्या इच्छेनुसार : सिबल

‘सेंन्गोल’ (राजदंड) हे ब्रिटिशांकडून सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून वर्णन करणाऱ्या भाजपवर राज्यसभेचे खासदार कपिल सिबल यांनी रविवारी टीका केली. ते म्हणाले, की भारतात सत्तेचे हस्तांतरण जनतेचे इच्छेने होते. स्वत:ला संविधानाला बांधील मानून जनता हा सत्ताबदल घडवते, असेही सिबल यांनी नमूद केले. सेन्गोलवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सिबल यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की भाजपच्या दाव्यानुसार सेन्गोल हे ब्रिटिशांकडून सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक आहे. माझ्या मते भारतीयांनी स्वत: राज्यघटना निर्माण करून त्यानुसार सत्तेच्या हस्तांतरणाची पद्धत स्वीकारली आहे. सेन्गोल हा देवी मीनाक्षीने मदुराईच्या राजाला प्रदान केला होता. राज्य करण्याच्या दैवी अधिकाराचे ते प्रतीक आहे.

‘तृणमूल’, ‘आप’ची टीका

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी स्वप्रतिमेच्या प्रेमात हरवून आत्मसंतुष्ट झाले आहेत. मोदींच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी संसदेची व सांसदीय कामकाजाची खिल्ली उडवून, अपमान केला. आम आदमी पक्षाचे (आप) ज्येष्ठ नेते संजय सिंह म्हणाले, की या सोहळय़ास राष्ट्रपतींना आमंत्रण नव्हते. भाजपची मानसिकता नेहमीच दलित आणि आदिवासीविरोधी असते. राष्ट्रीय जनता दलाचे (राजद खासदार मनोज झा उपहासाने म्हणाले, की या विशाल देशाला पुन्हा लोकशाहीकडून राजेशाहीकडे नेण्याचे आपले स्वप्न आज पूर्ण झाले, अशा भावननेने पंतप्रधानांना समाधान वाटत असेल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 00:03 IST
Next Story
आत्मनिर्भर भारताची पहाट, संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार