Amit Shah On POK : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला दिलेल्या जोरदार प्रत्युत्तराबाबत सध्या संसदेत चर्चा पार पडत आहे. संसंदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून ऑपरेशन सिंदूरसंदर्भात मंगळवारी लोकसभेत चर्चा पार पडली. त्यानंतर आज (३० जुलै) राज्यसभेत चर्चा पार पडली आहे. मात्र, ही चर्चा सुरू असताना ऑपरेशन सिंदूरच्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचंही पाहायला मिळालं.

राज्यसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत झालेल्या चर्चेनंतर विरोधकांनी सरकारला काही प्रश्न विचारले होते. मात्र, या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यसभेत उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी राज्यसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार घणाघात केला.

दरम्यान, राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) बाबत एक मोठं विधान केलं. ‘पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत आणण्याचं काम फक्त भारतीय जनता पक्षाचं सरकारच करेल’, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्यांवरून अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीकाही केली. या संदर्भातील वृत्त पीटीआयने एक्सवर दिलं आहे.

अमित शाह काय म्हणाले?

“मी काँग्रेस पक्षाला सांगू इच्छितो की, तुम्ही पाकव्याप्त काश्मीर (पीओके) दिलं, पण पीओके परत घेण्याचं काम फक्त भारतीय जनता पक्षाचं सरकारच करेल. बाकी कोणीही हे करू शकत नाही”, असं मोठं विधान गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. ते पुढे म्हणाले की, “आम्ही दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर, त्यांच्या मुख्यालयांवर, त्यांच्या संघटनांवर, त्यांच्या प्रशिक्षण शिबिरांवर आणि लाँचिंग पॅडवर लक्ष्यित हल्ले केले. आमचा हल्ला दहशतवादावर होता, पण पाकिस्तानने तो स्वतःवर हल्ला म्हणून घेतला”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

‘ऑपरेशन सिंदूर हे युद्ध नव्हतं’ : अमित शाह

शाह म्हणाले, “आम्ही पीओके का ताब्यात घेतलं नाही? ते (विरोधी पक्ष) विचारत होते. आज मी संपूर्ण देशासमोर स्पष्ट करू इच्छितो की ऑपरेशन सिंदूर हे युद्ध नव्हतं. आम्ही आमच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा वापर केला. २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला. प्रत्युत्तरा दाखल आम्हाला संपूर्ण दहशतवादी स्थळं नष्ट करण्याचा अधिकार होता, हा अधिकार जागतिक स्तरावर मान्य आहे आणि तो अधिकार आम्ही वापरला. त्यानंतर जेव्हा पाकिस्तानने म्हटलं की त्यांना संघर्ष नको, तेव्हा आम्ही ते स्वीकारलं”, असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.