Jaya Bachchan On Operation Sindoor : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला दिलेल्या जोरदार प्रत्युत्तराबाबत सध्या संसदेत चर्चा पार पडत आहे. ऑपरेशन सिंदूरसंदर्भात मंगळवारी लोकसभेत चर्चा पार पडली. त्यानंतर आज राज्यसभेत चर्चा पार पडत आहे. मात्र, ही चर्चा सुरू असताना ऑपरेशन सिंदूरच्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे.आज राज्यसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर झालेल्या चर्चेत खासदार जया बच्चन यांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी जया बच्चन यांनी ऑपरेशन सिंदूरच्या नावावरच प्रश्न उपस्थित केला आहे.

‘अनेक महिलांचं सिंदूर पुसलं गेलं. मात्र, तरीही ऑपरेशनला सिंदूर नाव का दिलं?’ असा सवाल जया बच्चन यांनी सरकारला विचारला आहे. जया बच्चन यांनी म्हटलं की, “मी सर्वात आधी तुमचं सर्वांचं अभिनंदन करू इच्छिते. कारण तुम्ही ज्या प्रकारचे लेखक ठेवले आहेत ते लेखक मोठमोठी नावे देत आहेत. खरं तर सिंदूर पुसलं गेलं आहे. पण तरी तुम्ही ऑपरेशनचं नाव सिंदूर ठेवलं. मग या ऑपरेशनला सिंदूर हे नाव का ठवेलं?”, असा सवाल जया बच्चन यांनी सरकारला विचारला आहे.

जया बच्चन यांनी व्यक्त केली नाराजी

‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेदरम्यान जया बच्चन सभागृहात बोलत होत्या. त्यावेळी काही सत्ताधारी खासदारांनी गोंधळ केला. मात्र, त्यावरून जया बच्चन या चांगल्याच संतापल्याचं पाहायला मिळाल्या. जेव्हा त्यांच्या भाषणावेळी काही खासदारांनी आवाज करायला सुरुवात केली जया बच्चन यांनी त्यांना सुनावलं. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रश्नोत्तरांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याच्या कारणावरून आणि सदस्यांनी केलेल्या गोंधळाबद्दल जया बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली.

जया बच्चन प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर संतापल्या

‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेदरम्यान जया बच्चन बोलत असताना काही सत्ताधारी खासदारांनी गोंधळ केला. त्यामुळे जया बच्चन यांना बोलताना अडथळा निर्माण झाला. त्यावरून गोंधळ घालणाऱ्या खासदारांना जया बच्चन यांनी सुनावलं. मात्र, त्याचवेळी जया बच्चन यांच्या शेजारी बसलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यावरही संतापल्या. जया बच्चन म्हणाल्या की, “प्रियंका मला नियंत्रित करू नको.” त्यानंतर प्रियांका चतुर्वेदी या देखील अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी हसत हसत स्वत:चा चेहरा हाताने लपवला.